वाशिम : जिल्हयात ग्रामीण व शहरी भागात दिपोत्सव हा सण मोठया प्रमाणात साजरा केला जातो.या उत्सवादरम्यान जिल्हयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता संयुक्त मुख्य विस्फोटक,नियंत्रक,नवी मुंबई यांच्या दि.26 सप्टेंबर 2018 रोजीच्या निर्देशानुसार फटाक्यांच्या दुकानांचे शेड हे आग प्रतिबंधक व पुर्णतः बंद असणे आवश्यक आहे.शेडमध्ये कोणताही अनोळखी इसम प्रवेश करणार नाही अशी व्यवस्था करण्यात यावी.फटाक्यांच्या दोन दुकानामधील अंतर 3 मीटर व प्रोटेक्ट वर्कपासून 50 मीटर अंतरावर असणे आवश्यक आहे. फटाक्यांच्या दुकानांची प्रवेशव्दारे एकमेकांकडे करुन नसतील याची दक्षता घ्यावी. दुकानामधील लाईटची व्यवस्था दुकानाच्या भिंतीवर सुरक्षितपणे केलेली असावी.फटाक्यांची डिजिटल जाहिरात फलके दुकानाच्या 50 मिटर अंतरावर असावीत.एका दुकानामध्ये जास्तीत जास्त 100 किलो ग्रॅम फायर वर्क्स तथा 500 किलोग्रॅम चायनीज,क्रेकर, स्पार्कलर्स स्फोटके ठेवली जातील याची दक्षता घ्यावी.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार फटाक्यांच्या दुकानामध्ये ग्रीन फायर क्रेकर विकली जातात.तरी नागरीकांनी दिवाळीच्या कालावधीत फटाके रात्री 08 : 00 ते 10 : 00 च्या दरम्यानच फोडावीत व गृह मंत्रालयाच्या 20 आक्टोंबर रोजीच्या निर्देशानुसार फटाका विक्रीची दुकाने खुल्या जागेत/ पटांगणामध्ये विक्रीसाठी असणे आवश्यक आहे.त्यामुळे एखादी घटना घडल्यास कमीत कमी नुकसान होईल.सार्वजनिक ठिकाणी, निवासी इमारतीमध्ये, गर्दीच्या ठिकाणी फटाके विक्री आणि साठवणूक करण्यास मनाई करण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.