अकोला -पुणे जिल्ह्यातील मंचर येथील महिला पत्रकार स्नेहा बारवे यांचेवर खूनी हल्ला करणाऱ्या आरोपींवर पत्रकार आणि महिला अत्याचार प्रकरणानुसार कडक कारवाई व्हावी अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख (निंबेकर) यांनी मुख्यमंत्री मा.देवेन्द्रजी फडणवीस यांचेकडे मेल व्दारे पत्र पाठवून केली आहे.यासंदर्भात लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या अकोला,अमरावती परभणी,पालघर,जिल्हा शाखांकडून निवेदने देण्यात आली असून आणखी काही ठीकाणांवरून निवेदने दिली जात आहेत.
पत्रकार हा छोटा आहे की मोठा, प्रिन्ट मिडीयाचा आहे की डीजीटल मिडीयाचा हे कोणतेही निकष मध्ये न आणता पत्रकारांवर अमानुष हल्ले करणाऱ्या समाजविघातक गुंडावर वेळ न दवडता पोलिस प्रशासनाने अविलंब कारवाया केल्या पाहिजेत.परंतू पोलिस प्रशासन तसे न करता आरोपींना संरक्षित करण्याची कर्तव्यप्रतारणा करीत आहेत.म्हणून गुंड राजरोसपणे पत्रकार,समाज आणि सामाजिक कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत.
पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालूक्यातील मंचर येथील महिला पत्रकार स्नेहा बारवे ह्या अतिक्रमणधारकाने ओढ्यावर भिंत बांधून पाणी अडवल्याने गावाला संभवणाऱ्या पुराच्या धोका प्रशासनासमोर ठेवण्याच्या जनसुरक्षेच्या गंभीर वास्तव प्रश्नाचे वृतांकन करीत होत्या.ते सुरू असतांनाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या पांडूरंग मोरडे व त्याच्या सहकारी गुंडांनी लाकडी दांड्यांनी प्रचंड मारहाण करून त्यांचेवर प्राणघातक हल्ला केला.यामध्ये हस्तक्षेप करणारांना सुध्दा या माजोरी लोकांनी मारहाण केली.
पत्रकारांवरील असे हल्ले हे लोकशाहीचे रक्षण आणि संविधानाचे संवर्धन करणाऱ्या पत्रकारांवर दबाव आणून त्यांचे आवाज बंद करणारी दडपशाही आहे.संबंधित मुख्य आरोपीने मंचर भाजी मंडईजवळील नाल्यात भराव टाकून अनधिकृत कामं सुरू केली होती. यावर संबंधित अधिकारी कारवाई करण्याची टाळाटाळ करीत होते.म्हणून ही धाडसी पत्रकार युवती या प्रकरणाला प्रसिध्दी देऊन वाचा फोडण्याचा प्रयत्न करणार होती.त्यामुळे वृत्तसंकलन सुरू असतांनाच तिच्या किंकाळ्यांचीही पर्वा न करता तिच्यावर आरोपी आणि सहकाऱ्यांनी अमानुष प्राणघातक हल्ले केले
या गंभीर विषयाकडे प्राधान्याने लक्ष देऊन,पत्रकार हल्ला आणि महिला अत्याचार प्रकरणातील गुन्हे नोंदवून या जेलमधून आलेल्या गुन्हेगारांना परत जेलमध्ये टाकावे अशी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून संजय एम.देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.