आरमोरी येथून ३ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वैनगंगा नदीच्या पात्रात दुपारी एका अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. अजूनपर्यंत तिची ओळख पटलेली नाही.
अरसोडा येथील शेतकरी शालिकराम लक्ष्मण पत्रे यांना त्यांच्या
शेताजवळ असलेल्या वैनगंगा नदीच्या पात्रात एका अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. याबाबतची माहिती त्यांनी
आरमोरी पोलिस स्टेशनला दिली.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतक महिलेच्या ब्लाउजमध्ये एक कापडी लालसर रंगाची पर्स मिळाली. पर्समध्ये तिकीट आढळले.
तिकिटावर पवनी असे लिहिले असून १५० रुपयांचे भाडे लिहिलेले आहे..सदर महिला नागपूरवरून पवनी येथे ट्रॅव्हल्सने प्रवास करीत होती. ही महिला पवनी हद्दीतील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदरचे प्रेत ५ ते ६ दिवसांपूर्वीचे आहे. कानात पिवळ्या धातूच्या बिया, पिवळ्या रंगाचा पेटीकोट व ब्लाउज घातला आहे. केस काळे, नाक सरळ आहे. तपास आरमोरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार संदीप मंडलिक करीत आहेत.