भंडारा:-नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास आपल्या शेताची पाहणी करावयास गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा शेततलावाच्या पाळीवरून पाय घसरून तलावात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ८ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास अंतरगाव शेत शिवारात उघडकीस आली आहे. भैरुदास सुखदेव गोटेफोडे (४४, लाखांदूर) असे घटनेतील मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिस सूत्रानुसार, भेरूदास यांची अंतरगाव शेत शिवारात मालकी शेतजमीन आहे. ते नेहमी शेतावर जात असे. घटनेच्या दिवशी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास भेरूदास नेहमीप्रमाणे मालकी शेतावर गेले होते. उशीर होऊही भेरूदास घरी न परतल्याने त्यांचा लहान भाऊ सुरेश त्यांना शोधण्यासाठी शेतशिवारात गेला. जवळपास १० वाजताच्या सुमारास सुरेश शेतशिवारात गेला असता भेरूदासने शेतात नेलेली मोटारसायकल रस्त्याच्या कडेला दिसली मात्र भेरूदास दिसून आला नाही. सुरेश घराकडे परत गेला. पुन्हा दुसऱ्या मार्गाने शेतशिवाराकडे गेला असता मृतक भेरुदास गोटेफोडे शेतातील शेततलावाच्या पाळीवर एक चप्पल दिसली दुसरी चप्पल शेततळ्यात तरंगताना दिसली. सुरेशने नजीकच्या शेतशिवारात असलेल्या अन्य नागरिकांना आवाज दिला. नजीकच्या नागरिकांनी शेततळ्यावर येत मच्छीमार बांधवांना पाचारण करून शेततळ्यातील पाण्यात शोध घेतला असता पाण्यात तळाशी भेख्दास यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देताच ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस नायक सुभाष शहारे, सतीश सिंगनजुड़े, संदीप बावनकुळे, पोलिस अंमलदार अनिल राठोड यासह पोलिस पथकाने येवून पंचनामा केला व प्रेत उत्तरणीय तपासणीसाठी पाठिवले.