नागपूर:-( किशोर मुटे )
शेतामध्ये कृषी पंपासाठी व अन्य शेतीच्या कामाकरीता विज पुरवठा नियमित नसल्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून आत्महत्त्यांसारखी सारखी पाऊले उचलत आहे. तेव्हा विद्युत मंडळाने शेतक-यांना २४ तास अखंडीत विजेचा पुरवठा करावा अशी आग्रहाची मागणी १५ मार्च जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्याने अ.भा.ग्राहक पंचायत महाराष्ट्र व गोवा राज्याचे पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री गजानन पांडे यांनी केली आहे .
श्री पांडे पुढे म्हणाले की, विद्युत मंडळ कुठल्याही उद्योगाला २४ तास अखंडीत विजेचा पुरवठा करते, परंतु शेतक-यांना आठवडयातून तीन दिवस फक्त दिवसा तीन-चार तास व चार दिवस रात्री चार-पाच तास विजेचा पुरवठा करते, तो ही खंडीत स्वरूपात..हा सरकारचा भेदभाव करणे असून ही बाब शेतक-यांवर वारंवार अन्याय करणारी आहे. जो शेतकरी रात्रंदिवस मेहनत-मजूरी करुन अन्यधान्य पिकवितो त्यांचेवर सतत अन्याय केल्या जातो, व उद्योगधंदेवाल्यांसमोर लाल कारपेट अंथरली जातात. हा भेदभाव कां ? असा सवालही ग्राहक पंचायतने उपस्थित केला आहे.
उद्योगधंदेवाल्यांकडे लाखो रुपये थकीत असतांना त्यांचेवर मेहेरबाणी केली जाते, परंतु गरीब शेतक-यांकडे हजार रुपयांची जरी थकबाकी असेल तर त्यांची लगेच वीज कापल्या जाते व त्यांना रस्त्यांवर आणल्या जाते. त्या गरीब शेतक-यांना रस्त्यांवर उतरुन आंदोलन करावे लागते, याकडे लक्ष वेधून हे आता खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही अ.भा. ग्राहक पंचायतने दिला आहे.
या मोठया उद्योगधंदेवाल्यांकडे असलेल्या लाखोंच्या थकबाकी बाबत अ.भा.ग्राहक पंचायत नागपूर यांनी एक जनहित याचिका दाखल केली होती. थकबाकी वसूल करण्याबाबत विद्यूत मंडळाला एकप्रकारे मदत केली होती. याकडेही ग्राहक पंचायतने लक्ष वेधले आहे.
शेतक-यांना ब-याच सरकारी योजनांवर सरकारी अनुदान दिल्या जाते. तर ८०-९० टक्के अनुदान दिल्याची प्रसिध्दी केल्या जाते परंतु प्रत्यक्षात ५० टक्केच अनुदान शेतक-यांच्या खाती जमा होते, याकडेही ग्राहक पंचायतने लक्ष वेधून जेवढे अनुदान जाहीर केले जाते त्या १०० टक्के अनुदानाची रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणीही गजानन पांडे यांनी केली आहे.
शेतक-यांचे निसर्गामुळे वारंवार होणारे पिकांचे नुकसान, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे वारंवार होणारे पिकांचे, फळांचे नुकसानीबाबत महाराष्ट्र सरकारतर्फे नुकसान भरपाईबाबत बांधावर येवून फक्त घोषणा केल्या जातात. परंतु प्रत्यक्षात शेतक-यांना नुकसान भरपाई मिळत नाही. ही शोकांतिका असून याकडेही लक्ष वेधून केलेल्या घोषणांची प्रत्यक्षात १०० टक्के अंमलबजावणी करुन शेतक-यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही अ.भा.ग्राहक पंचायतचे पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री (महाराष्ट्र व गोवा) गजानन पांडे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....