कारंजा (लाड) : संत तुकाराम महाराज म्हणतात, "आम्ही नोहे विधीचे जन ते! रचत रचिले अम्हा आम्ही !" या अभंगवाणी प्रमाणे कु.पूनम बंग यांनी समाजाशी सामाजिक बांधिलकी ठेवून त्यांची सेवा करण्यासाठी स्वतःची दिनचर्या स्वतः ठरवीली. केवळ दिनचर्या ठरवून त्या थांबल्या नाहीत तर आपले संपूर्ण जीवनच त्यांनी समाजसेवेकरीता समर्पित केल्याचे दिसून येते. समाजातील अनेक महिला व युवतींना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या दिशेने त्यांनी "ध्यास एक न संपणारा प्रवास" हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून, येवता (बंदी) सारख्या छोट्याशा गावखेड्यामधून,ध्यास सामाजिक संस्था स्थापन करून संस्थेच्या माध्यमातून तरुणींचे मजबूत असे संगठन केले. आपल्या संस्थेद्वारे त्यांनी "तरुणींना,शिका ! प्रशिक्षण घ्या !! आणि स्वयंरोजगार मिळवा !!!" हा मोलाचा संदेश दिला. त्यांनी अनेक महिला व युवतींना रोजगाराची संधी तर दिलीच शिवाय त्या सोबतच महिलांच्या आरोग्याविषयी सुद्धा नि:स्वार्थ मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांच्या महिलाविषयक कार्याला जिल्ह्यामध्ये तोड नाही. त्यांचे सामाजिक कार्य निरंतर सुरु आहे. एक स्वच्छ प्रतिमा,स्पष्ट वक्ता आणि झुंजार नेतृत्व म्हणून त्या सुप्रसिद्ध आहेत. शिस्तबद्धता,नीटनेटकेपणा तसेच वेळेचे बंधन पाळणारी,स्वच्छ मनाची कुमारीका म्हणून त्यांचा जिल्ह्यात नावलौकिक आहे. कोव्हिड १९, कोरोना काळात त्यांनी सगळीकडे संचार बंदी असतांना तळागाळातील भुकेल्या जीवांना अन्न, तहानलेल्यांना पाणी दिले व गरजूंना तात्काळ आरोग्य सेवा देण्यासाठी अपार कष्ट घेतले. पण कधी ही त्यांनी आपल्या कार्याची वाच्यता केली नाही. रात्रंदिवस त्यांच्याकडे वेळी अवेळी वयोवृद्ध महिला , युवती, विद्यार्थिनी विविध समस्या घेऊन येतात. कु पूनमताई त्यांच्या अडचणीवर तोडगा काढून त्यांना शक्य तेवढी मदत करतात. मोफत व योग्य मार्गदर्शन करत असल्यामुळे समाजामध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांच्या हातून महिला सक्षमीकरणाचे ध्येय गाठल्या जाईल ह्यात शंकाच नाही. त्यांना भविष्यातील यशस्वी वाटचालीकरीता करंजमहात्म्य परिवारातर्फे माझ्या कोटी कोटी शुभेच्छा ! .