वाशिम : "शिवबावर राजमाता जिजाऊ आऊसाहेबांनी आदर्श असे सुसंस्कार घडवून,त्यांना कुळाचार,सामाजिक जाणिव,धर्मसंस्कार,युद्धकौशल्य,राजनितीचे धडे देऊन शिवबाचे चारित्र्य न्यायनितीने घडवून त्यांचे जीवन आपल्या समाजाला अर्पण केले.त्याचमुळे बाल शिवबा भविष्यात छत्रपती शिवाजी होऊन,हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकलेत. परंतु आजचे दुदैव म्हणजे आज आपल्या देश धर्माचा आणि कुळाचा इतिहास विसरून, आजची एकत्र कुटूंब पध्दती संपुष्टात येत असल्यामुळे, आज घरात दोघे पती पत्नीच असतात.त्यातही शहरात राहणारे पतीपत्नी दोघेही नोकरी किंवा व्यवसाय करणारे असल्यामुळे या दाम्पत्यांना आपले म्हातारे आई वडिल घरात नकोसे असतात.
त्यामुळे घरात त्यांची अडचणच नको म्हणून ते आपल्या आई वडिलांना नकोसे समजून वृध्दाश्रमात पाठवीत आहेत. त्यामुळे त्यांच्या चिमुरड्यांना सांभाळायला घरात म्हातारे आजी आजोबा सुद्धा नसतात.अजाण मुले जर रडली तर आजची माता त्या मुलाकडे मोबाईल देऊन किंवा टिव्ही वरील कार्टून दाखवून त्यांचा सांभाळ करीत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष आईकडूनच आज मुलांवर अभद्र संस्कार होत आहेत. त्याचा वाईट परिणाम होऊन आजची बालके मोबाईलच्या व्यसनाच्या अधिन प्रत्यक्ष आईकडूनच करण्यात येत आहेत.त्याचे वाईट परिणाम म्हणजे त्यांचेवर यापुढे कोणतेही सुसंस्कार घडणारच नाहीत. मुलांवर मोबाईलच्या अती वापरामुळे,एकलकोंडेपणा,नशा पाणी, दुर्व्यसने,वादविवाद व सैराट भानगडीचे कुसंस्कार होण्याचीच दाट शक्यता आहे. तरी आजच्या बालकांच्या आई वडीलांनी,जास्त पैसा मिळविण्याच्या मागे न लागता, आधी आपले कुटूंब व घरदार सांभाळीत,वयोवृद्ध आईवडिलांना आपल्या नजरेसमोर ठेऊन त्यांची सेवा करावी.व आपल्या मुलामुलीवर चांगले सुसंस्कार घडवून चांगली संतती हीच खरी संपत्ती आहे.हे लक्षात घेऊन आयुष्याची खरी (संततीची)संपत्ती मिळवावी.अन्यथा जसे तुम्ही तुमच्या आईवडीलांना वृद्धाश्रमात पाठवीले.ज्याप्रकारे आई वडिलांचा तुम्ही छळ केला तसा भविष्यात तुमचा छळ होणार आहे.आणि आपल्या मुलामुलीवर सुसंस्कार करण्यात तुम्ही जर कमी पडलात तर तुमची मुलंमुली तुमच्या इभ्रतीचे वाभाडे काढणार आहेत.आणि अशी वेळच येऊ द्यायची नसेल.आपल्या घराण्याचा नावलौकीक वाढवायचा असेल.तर कृपा करून आपआपल्या मुलामुलीवर लक्ष्य केन्द्रित करून चांगले सुसंस्कार घडवावेत." असे आख्यान,जय भवानी जय मल्हार गोंधळी कला मंच कारंजाचे संचालक महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त गोंधळी संजय कडोळे, कमलेश कडोळे यांनी धनज बु येथील आपल्या कार्यक्रमात, शनिवार दि १० जून रोजी केले. प्रथमेश टेकाडे यांचे कडे विवाह समारंभानिमित्त झालेल्या संजय कडोळे यांच्या गोंधळ जागरण कार्यक्रमाला वऱ्हाडा सोबतच यावेळी बहुसंख्येने पंचक्रोशीतील गावकरी मंडळीची उपस्थिती होती.