कारंजा लाड -- कमिशनखोरीच्या नादात नगर परिषदेत दर्जाहिन पद्धतीने विकास कामे केली जात आहे. या दर्जाहीन कामांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून काँग्रेसचे देवानंद पवार यांनी कारंजा नगर परिषदेच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. दरम्यान दिनांक 29 जुलै रोजी नागरिकांनी जन आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी केले आहे. ते आज कारंजा लाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
गेल्या तीन वर्षापासून कारंजा नगर परिषदेत प्रशासक राज सुरू आहे. राजकीय आशीर्वादामुळे येथील कर्मचारी तसेच अधिकारी कमिशन खोरीच्या मागे लागले आहे. पावसाळ्यापूर्वी करावयाची नाली सफाईची कामे करण्यात न आल्याने अनेक भागात नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरत आहे. शहरात जागोजागी कचरा पडून असल्यामुळे दुर्गंधी पसरली असून रोगराई पसरण्याची शक्यता दिसून येत आहे. कारंजा नगर परिषद क्षेत्रात नव्याने बनलेल्या वस्त्यांमध्ये कुठलीही प्राथमिक सुविधा देण्यात येत नाही मात्र टॅक्स नियमितपणे वसूल केल्या जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. दहा ते पंधरा दिवस घंटागाडी येत नसल्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. बांधकाम परवानगी, जन्म मृत्यूचे दाखले, नळ कनेक्शन व शिवाय कोणत्याही कामासाठी लाच घेतल्याशिवाय एकही काम केल्या जात नाही. शहरातील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. नाल्याची साफसफाई न झाल्याने पाणी साचून मच्छरांची पैदास वाढली आहे, यामुळे अनेक आजार पसरले आहे. अति कमिशनखोरीच्या नादात कमकुवत व कमजोर पद्धतीने बसविण्यात आलेले स्ट्रीटलाईट यावर्षीच्या पहिल्याच पावसात पडल्याने नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. शहरात धुर फवारणी केल्या जात नसल्याने नागरिकांना साथरोगाची लागण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मोकाट कुत्रे व जनावरे यांचा बंदोबस्त न झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून लहान मुले व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पाण्याचा टाक्यातून पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक संतप्त आहे. नगर परिषदेच्या उर्दू व मराठी शाळेतील शिक्षकांची भर्ती न केल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. याशिवाय शहरातल्या अनेक भागांमध्ये अंगणवाडी नसल्यामुळे बाल विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होत आहे. शहरातील रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या खांबांवर लाईट न बसवल्यामुळे अनेक भागात रात्री अंधाराचे साम्राज्य राहते, यामुळे महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नगर परिषदेच्या मालकीचा दवाखाना आजारी पडला आहे. शहरातील कचरा जांब रोड तसेच इतर ठिकाणी बेवारस पद्धतीने फेकल्या जात असल्याने या रस्त्यावर चालणाऱ्या व परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. नगर परिषद हद्दीमध्ये नव्याने सामील केलेल्या पानविहीर या गावाकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. शाळा-कॉलेज असलेल्या भागात रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अपघातात वाढ झाली आहे. नगरपालिका हद्दीत गेल्या अनेक वर्षा पासून वास्तव्यास असलेले मात्र शासन मालकीचे नमुना ड न मिळाल्याने घरकुल सारख्या योजने पासून मोठ्या प्रमाणात नागरिक वंचित झाले आहे. यासंदर्भात अनेकदा निवेदन देऊनही नगरपरिषद प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती देवानंद पवार यांनी दिली.
यावेळी व्यासपीठावर देवानंद पवार यांच्या सोबत प्रदेश काँग्रेस चे सचिव दिलीप भोजराज, रमेश पाटील लांडकर, वाशिम जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस संदेश जैन जिंतुरकर, ॲड निलेश कानकिरड , युसुफ भाई जट्टावाले, तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष विजय देशमुख, शहर कॉग्रेस चे अध्यक्ष अमीर खान पठाण, नंदीम खांन, अशोक मोरे, बेलसरे, प्रा.स्वप्नील तायडे, मैनुद्दीन सौदागर आदी पदाधिकारी उपस्थित होते
आढावा बैठकीत संचलन ॲड संदेश जैन जिंतुरकर व आभार प्रदर्शन ॲड निलेश कानकिरड यांनी केले
नागरिकांनी सहभागी व्हावे
अनेकदा मागणी करून तसेच निवेदन देऊनही नगरपरिषद प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन देवानंद पवार यांनी केले आहे.