वाशिम - स्थानिक सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत शनिवार, २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून योगसत्राचा प्रारंभ केला. विद्यार्थ्यांना अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार, भुजंगासन, त्रिकोणासन, शवासन यासारखी योगासने तसेच विविध प्राणायाम प्रकार शिकविण्यात आले व प्रत्यक्षात करून घेतले गेले. योगसत्रानंतर आयोजित केलेल्या लघुवक्तृत्व सत्रात विद्यार्थ्यांनी योगाचे शारीरिक, मानसिक आणि आत्मिक फायदे विषद केले. योगसाधनेनंतर मनःशांती, ताजेपणा आणि तणावमुक्तीचे अनुभव अनेक विद्यार्थ्यांनी सांगीतले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढली असून, योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे, तर जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग हा संदेश प्रभावीपणे अधोरेखित झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुकुंद एज्युकेशन सोसायटीच्या सचिव अँड. वैशाली वालचाळे, संचालक प्रसन्ना वालचाळे व नीरज वालचाळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या प्रेरणादायी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यस्नेही आणि शिस्तबद्ध जीवनशैलीची बीजे निश्चितच रुजली गेली.