वाशिम - इतिहासकालीन मंदिरे आणि राजवाड्या सारख्या पुरातन इमारती,जैनधर्मिय तिर्थक्षेत्र,नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे ‘अ’ वर्ग दर्जाप्राप्त जगप्रसिध्द श्री गुरुमंदिर संस्थान आदी सांस्कृतीक आणि ऐतिहासिक वैशिष्ट्ये असलेल्या कारंजा नगरील शासनाने पर्यटन व तिर्थक्षेत्राचा दर्जा देवून येथे विकास कामे सुरु करुन पर्यटनाला चालना द्यावी अशी मागणी विदर्भ लोककलावंत संघटनेने केली आहे.या मागणीसाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे यांच्या नेतृत्वात मंगळवार, दि.५ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, जिल्हयातील कारंजा नगरी ही ऐतिहासिक आणि जैनधर्मिय तिर्थक्षेत्र तसेच नृसिंह सरस्वती स्वामी यांचे विश्वप्रसिद्ध श्री गुरुमंदिर संस्थान असलेली नगरी म्हणून विदर्भात प्रसिद्ध आहे. येथील श्री गुरुमंदिर संस्थानला महाराष्ट्र शासनाने ‘अ’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे. या सांस्कृतिक शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती ही भारतातील पहीली बाजारपेठ असून एकेकाळी हे शहर व्यापारी शहर म्हणून ओळखले जात होते. तसेच शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या या शहरात नामांकीत अशा माध्यमिक शाळा आणि दरवर्षी प्राविण्य प्राप्त करणारे विद्यार्थी असतांना मात्र त्यांच्या उच्च शिक्षणाकरिता कोणतीच उच्च महाविद्यालये व सोयीसुविधा नाहीत. तसेच नामांकीत बाजारपेठ असूनही शेतमालावर प्रक्रिया करणारे कोणतेच उद्योगधंदे किंवा महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळाची औद्योगिक वसाहत व कारखाने नसल्यामुळे येथील मजुर आणि सुशिक्षित बेरोजगारांना उदरनिर्वाहाकरिता रोजगाराचे साधन नाही. कारंजा तालुक्यात सर्वधर्मियांची तिर्थक्षेत्रे आणि महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाचे सोहळ काळविट अभयारण्य ह्या जमेच्या बाजू असतांना सुद्धा कारंजा शहर व तालुका विकासपासून वंचितच राहीलेला आहे. त्यामुळे तिर्थक्षेत्र व पर्यटनाची पोषक बाजु असलेल्या कारंजा नगरीच्या पर्यटन विकासाला चालना देवून या नगरीची भरभराट होण्यासाठी शासनाने कारंजाला पर्यटन व तिर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा व विकास आराखडा तयार करुन पर्यटन व तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत विकास कामे मंजुर करावी. व स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी विदर्भ लोककलावंत संघटनेच्या वतीने संजय कडोळे यांनी शासनाला केली आहे. यावेळी कारंजा येथील युवा पत्रकार तथा वैदर्भिय नाथ समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार प्रामुख्याने उपस्थित होते. असे वृत्त उमेश अनासाने यांचेकडून प्रसिद्धीपत्रकातून कळविण्यात आलेले आहे.