जिल्ह्यातील १८०५० मतदार बजावणार मतदानाचा हक्क
२६ मतदान केंद्रावर होणार मतदान
३० जानेवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदान
वाशिम : आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे वाशिम जिल्ह्यात शासनाकडून, पदवीधर निवडणूकीची तय्यारी पूर्ण झालेली असून, आज सोमवार दि . ३० जानेवारी रोजी, नव्याने पदवीधर मतदार नोंदणी केलेले नवीन मतदार सुद्धा मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे वृत्त प्राप्त झालेले आहे. याबाबत संजय कडोळे यांच्या माहिती नुसार, संविधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी ३० जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील एकूण २६ मतदान केंद्रावर या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.या निवडणुकीत जिल्ह्यातील १८ हजार ५० मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १३ हजार ३३३ पुरुष मतदार,४ हजार ७१५ स्त्री मतदार आणि २ इतर मतदारांचा समावेश आहे.मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत असणार आहे.
२६ मतदान केंद्रावर मतदान
जिल्ह्यातील २६ ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावर या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.यामध्ये वाशिम येथील राजेंद्र प्रसाद विद्या मंदिर सिव्हिल लाईन येथील तीन केंद्रावर,लॉयन्स विद्या निकेतन सिव्हिल लाईन येथील तीन केंद्रावर,अनसिंग येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा,मालेगाव येथील निवासी नायब तहसीलदार यांचे कक्ष, शिरपूर येथील आठवडी बाजारातील जिल्हा परिषद मुलांची शाळा,जउळका/रेल्वे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,रिसोड येथील तहसील कार्यालय सभागृह क्रमांक एक,सभागृह क्रमांक दोन आणि सभागृह क्रमांक तीन,रिठद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केनवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,मोप येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,धानोरा(खुर्द) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,मंगरूळपीर येथील तहसील कार्यालयाचे सभागृह,शेलू(खुर्द) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,कारंजा येथील मूलजी जेठा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या खोली क्रमांक एक आणि दोन,रामप्यारी लाहोटी कन्या शाळा खोली क्रमांक एक आणि दोन,कामरगाव येथील जिल्हा परिषद सर्व शिक्षा अभियान खोली, मानोरा येथील मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय आणि शेंदुर्जना (आढाव) येथील श्री.आप्पास्वामी ज्युनिअर कॉलेज या मतदान केंद्राचा समावेश आहे.
असे नोंदवता येईल मतदान
या निवडणुकीत पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे. मतदान पद्धतीबाबत भारत निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.त्याचे पालन करून मतदारांनी मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी केले आहे.
मतदान करताना केवळ आणि केवळ मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केच पेनने मत नोंदवावे लागणार आहे. इतर कोणताही पेन,पेन्सिल, बॉलपेनचा वापर करु नये.आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील "पसंतीक्रम नोंदवावा"या रकान्यात "१"हा अंक लिहून मत नोंदवावे.निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत, तितके पसंतीक्रम आपण मतपत्रिकेवर नोंदवू शकता.पुढील पसंतीक्रम उर्वरित उमेदवारांसमोरील रकान्यात २,३,४ इत्यादीप्रमाणे आपल्या पसंतीप्रमाणे नोंदवता येतील.एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकच पसंतीक्रमाचा अंक नोंदवावा.तो पसंतीचा क्रमांक इतर कोणत्याही उमेदवारासमोर नोंदवू नये.
पसंतीक्रम हे केवळ १, २, ३ इत्यादी अंकामध्येच नोंदविण्यात यावेत. ते एक,दोन, तीन इत्यादी अशा शब्दांमध्ये नोंदवू नयेत.पसंतीक्रम नोंदविताना वापरावयाचे अंक हे भारतीय अंकाच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपात जसे 1, 2, 3 इत्यादी किंवा रोमन अंक स्वरूपात I, II, III किंवा मराठी भाषेतील देवनागरी १,२,३ या स्वरूपात नोंदवावे.
या निवडणुकीत शासकीय/निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे यासाठी ३० जानेवारी रोजी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे.कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त ही रजा असणार आहे.उद्या फक्त ज्या शाळा ह्या मतदान केंद्र आहे,त्याच शाळाना सुटी राहणार आहे. अन्य ठिकाणी नियमित शाळा सुरू राहतील.
मतदान करायला जाताना मतदारांनी सोबत मोबाईल फोन,पेन, पेन कॅमेरा,अन्य कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट सोबत घेऊन जाऊ नये.कोणत्याही आक्षेपार्ह वस्तूंना आत घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या या निवडणुकीसाठी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.वाशिम आणि अनसिंग येथील सात मतदान केंद्रासाठी उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवर, मालेगाव,शिरपूर व जउळका/रेल्वे येथील तीन मतदान केंद्रासाठी उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण, रिसोड,रिठद आणि केनवड येथील सहा केंद्रासाठी वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत,धानोरा (खुर्द),मंगरूळपीर आणि शेलु (खुर्द) येथील तीन मतदान केंद्रासाठी मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे,कारंजा आणि कामरगाव येथील पाच मतदान केंद्रासाठी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे,मानोरा आणि शेंदूर्जना(आढाव) येथील केंद्रासाठी मानोरा तहसीलदार ज्ञानेश्वर घ्यार यांची क्षेत्रीय अधिकारी म्हणून तर अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी म्हणून रिसोड तहसीलदार अजित शेलार,मालेगाव तहसीलदार रवी काळे,वाशिम तहसीलदार विजय साळवे व कारंजा तहसीलदार धीरज मांजरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील २६ मतदान केंद्रावर सुक्ष्म निरीक्षक नियुक्त केले आहे.बँक आणि एल.आय.सी चे अधिकारी हे सूक्ष्म निरीक्षक म्हणून काम पाहणार आहे.जिल्ह्यातील सर्व २६ मतदान केंद्रावरून वेब कास्टिंगची व्यवस्था करण्यात आली असून विभागीय आयुक्तांना ही मतदान प्रक्रिया थेट त्यांच्या कार्यालयातून बघता येणार आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....