आपलं गाव तीर्थ व्हावं, हे ध्येय साधायचं असेल तर समविचारी मंडळीचे संघटन बांधणे गरजेचे आहे. संघटन हे ग्रामसुराज्य निर्मितीचे महत्त्वाचे साधन होय. व्यक्तीनिष्ठ संघटनेपेक्षा तत्वनिष्ठ संघटन केव्हाही श्रेष्ठ होय. गावात संघटना झाली की, गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना करून सामुदायिक प्रार्थनेला सुरूवात करावी. यातीलच चांगला व्यक्ती निवडणुकीत पुढारी करावे आणि त्यालाच निवडून आणावे. गावातील वाईट, दुर्जन व्यक्तीच्या आमिषाला बळी पडू नये. आजकाल निवडणुकीत निवडून येण्यासाठी दुर्जन लोक पैसा, कपडा-लत्ता आणि दारु पिणाऱ्यास दारु पाजतात. फजूल लोक इमानदार माणसाला मत न देता दुर्जनाला मत देतात. आपला समाज हा अंगी प्रचंड शक्ती असून अजगरासारखा निद्रिस्त आहे.
पुढारीपण सेवेनेच मिळे ।
हेच बोलावे मिळुनी सगळे ।।
तेथे पक्षबाजीचे चाळे ।
वाढोचि न द्यावे ।।
भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे ।
आपल्या मतावरीच साचे ।।
लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे. प्रामाणिक माणसाला मते दिली तर, ती मते गावाला, राष्ट्राला पोषक ठरतील. मानवाचे समूळ जीवन बदलवून टाकणारी ही ग्रामगीता प्रत्येकाने समजून घेतली तर खरी विश्वशांती निर्माण होईल.
निवडणुकीचे दुष्परिणामः-
निवडणुकीकरिता मोठ्या कष्टाने सज्जनांना एकत्रित आणले परंतु जे एकदा चुकले ते काही केल्या नीट होत नाही. गावात सुंदर सुधारणा व्हावी म्हणून विचार विनिमयासाठी लोकांची एक कमेटी बसली, त्यांनी ठरविले की, प्रथम पुढारी निवडावा. त्यासाठी गावात निवडणुक केली पाहिजे.
कोण गावाचा पुढारी ठरवावा?।
आधी मान कोणास द्यावा?।
कोणाच्या हाते चालवावा ।
कारभार गाव सेवेचा?।।
म्हणोनि निवडणुक ठरविली ।
ती जणु आगीत बारुद पडली ।
अथवा राॕकेलची टाकीच ओतली ।
अग्निमाजी ।।
गावाचा नेता कोण ठरविणार? कार्याचा मान आधी कोणाला द्यावा? गावच्या सेवेचा कारभार कोणाच्या हातून करावा, म्हणून पुढाऱ्यासाठी निवडणुक घ्यायचे ठरले. आगीत बारुद पडावी अथवा मातीच्या तेलाची टाकीच ओतल्या जावी. त्यामुळे जसा एकदम आगीचा भडका उठावा तसा साऱ्या गावात मतमतांचा हलकल्लोळ झाला, शहाणे, समजदार माणसेही एकमेकांना पाण्यात पाहू लागले. जो तो स्वतःला फार शहाणा समजू लागला, त्यामुळे कोणी कोणाचे ऐकायला तयार नाही. सगळीकडे कहर माजला. आरडाओरडीला सिमा राहिली नाही.
घरोघरी मारामारी ।
बायको उठुनि नवऱ्यास मारी ।
मुले म्हणति आम्ही शहाणे भारी ।
पुस्तके सारी शिकलो की ।।
घरोघरी मारामारी सुरू झाली. बायकोने नवऱ्याला ठोकावे, इथपर्यंत मजल गेली शिक्षण घेतल्याने. तुमच्यापेक्षा आम्ही जास्त शिकलो असे घरची मुलेही घमेंड करु लागली. अशा परिस्थितीत नेता कुणाला मानावे? गढूळ पाण्यात कितीही ढवळले तरी शेवटी घाणच वर येईल. सेवेची आवड असावी.
यासाठी आधी सेवाभावी ।
लोकांचीच संघटना व्हावी ।
तेथे विद्याचि नसावी ।
अन्य कोणासि ।।
गावातील सर्व मंडळींनी एकत्र जमून ज्यांना सेवेचा जिव्हाळा असेल अशा लोकांना जमवून संघटन करावे. तेथे स्वार्थी लोकांना वाव नसावी. गावातील एकेक सज्जन शोधून त्यांचे सेवाभावी लोकांचे एक मंडळ, संघटन तयार करावे.
मत हे दुधारी तलवार ।
उपयोग न केला बरोबर ।
तरी आपलाचि उलटतो वार ।
आपणावर शेवटी ।।
दुर्जन होतील शिरजोर ।
आपुल्या मताचा मिळता आधार ।
सर्व गावास करतील जर्जर ।
न देता सत्पात्री मतदान ।।
गावाचे किंवा देशाचे पुढील भवितव्य आपल्या मतावरच अवलंबून आहे. एक एक मत लाख मोलाचे समजून निवडणुकीत मताचे महत्त्व ओळखावे. मत दोन्ही कडून धार असलेली तलवार आहे. तिचा उपयोग योग्य केला तर आपले रक्षण होते, न केला तर आपला वार आपल्यावर उलटून प्राण जाण्याची भिती असते. आपल्या मताचा दुर्जनांना आधार मिळाला की, ते नंतर आपल्यावर शिरजोर होऊन गावाला सळो की पळो करुन सोडतील. याचे कारण आपण योग्य व्यक्तीला मतदान केले नाही. निवडणुक ही बाजारातील गमंत नव्हे किंवा शौकाखातर केले ते मनोरंजन नव्हे. गावाचे उज्वल भविष्य घडविण्याची ती नेमकी संधी आहे. निवडणुक म्हणजे जणु स्वयंवर आहे असे राष्ट्रसंत ग्रामगीतेत म्हणतात. समर्थ रामदास स्वामींनी फोड शिष्याला तोंडाने चोखायला लावून त्यातून शिष्याची निवड केली होती तसेच आत्म बलिदान देण्यासाठी कोण तयार आहे? असे आव्हान करून गुरु गोविंदसिंहानी आपला शिष्य निवडला होता. याप्रमाणेच निवडणुकीचे आहे. ज्याने सर्वात मोलाचे काम केले असेल तोच नेता निवडून द्यावा.
देती मिळवोनि दुर्मिळ सामान ।
कोणास काही प्रलोभन ।
व्यसनी गुंडास देती प्रोत्साहन ।
करिती संपादन प्रेम ऐसे ।।
निवडणुक आली की, व्यसनी व गुंडगिरी करणाऱ्या बाबतीत दारु पाजून आपलेसे करतात आणि दुर्जन लोक मत त्याच्याकडून घेतात. भोळी भाबडी जनता ही फसून त्याच्या जाळ्यात आयतीच सापडते. या दारुपायी आदर्श गाव पार बिघडून जाते.
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....