कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. राजेंद्र पाटणी यांच्या पाठपुराव्याला यश !
वाशिम : राजे वाकाटकांची राजधानी म्हणून ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वत्सगुल्म वाशिम जिल्ह्यात उच्च शिक्षणाचे नवेनवे दालनं खुले करण्याच्या महत्वाकांक्षी उद्देशाने झपाटलेल्या आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रयत्नांना आज मोठे यश प्राप्त झाले आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरिश महाजन यांनी वाशिम जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली. कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आ. राजेंद्र पाटणी यांनी या घोषणेला दुजोरा दिला आहे.
1 जुलै 1998 ला नव्याने निर्माण झालेल्या वाशिम जिल्ह्यात अद्यापही उच्च शिक्षणाच्या सुविधा तोकड्याच आहेत. परिणामी येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. नेमकी हीच बाब हेरून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांनी जिल्ह्यात उच्च शिक्षणाची नवनवीन दालनं सुरू व्हावी यासाठी शासनदरबारी तगादा लावणे सुरू केले होते. सन 2014 मध्ये राज्यात सत्तारूढ असणाऱ्या मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा युती सरकारने वाशिम जिल्ह्यात शासकीय दंत महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र वैद्यकीय महाविद्यालय असेल तेथेच दंत महाविद्यालय सुरू करता येईल असे धोरण मेडिकल कौन्सिलने बनविल्यामुळे प्रस्तावित दंत महाविद्यालय तेव्हा सुरू होऊ शकले नव्हते. त्या बाबीचे शल्य आ.पाटणी यांना सारखे बोचत होते. त्यानंतर त्यांनी वाशिम जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता. परंतु सन 2019 नंतर राज्यात सत्तापालट झाल्यामुळे त्यांची ही मागणी रखडली होती. गत दोन महिन्यांपूर्वी राज्यात सत्तापालट होऊन भाजपा व शिवसेनेचे सरकार सत्तारूढ झाले. त्यानंतर आ.पाटणी यांनी पुन्हा एकदा वाशिम जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची मागणी सरकारकडे रेटून धरली. आमदार पाटणी यांच्या मागणीची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.गिरीश महाजन यांनी वाशिम जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.महाजन यांनी त्याबाबत अधिकृत घोषणा केली असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी दिली.
जिल्ह्यातील रूग्णसेवेचा दर्जा सुधारणार
वाशिम जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न कमी असल्यामुळे मानव विकास निर्देशांकात जिल्हा पिछाडलेला आहे. त्यामुळेच वाशिमच्या भाडी आकांक्षीत जिल्हा म्हणून कलंक लागलेला आहे. जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्यास विकासाला चालना मिळेल यातूनच दरडोई उत्पन्न वाढून मानव विकास निर्देशांकात सुधारणा होईल. त्यामुळे आकांशीत जिल्हा म्हणून लागलेला कलंकही पुसल्या जाईल. वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर आपसूकच येथील वैद्यकीय सेवांचा दर्जा सुधारेल. विविध सुविधा अभावी उपचारासाठी बाहेर जाणाऱ्या रुग्णांना जिल्ह्यातच उपचार मिळतील याचा फायदा जिल्हावासीयांना होणार आहे असे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना आ राजेंद्रजी पाटणी यांचे स्विय सहाय्यक तथा भाजपा प्रसिद्धी प्रमुख संजय भेंडे यांचेकडून मिळाले आहे.