ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील ग्रामीण भागाचे कणा असलेल्या पंचायत समिती ब्रम्हपुरी येथे संपूर्ण विभागात पाणी गळती सुरू असलेली दिसून येत आहे. काही वर्षांपासून जिर्णोद्धार झालेली पंचायत समिती कार्यालय शासनाकडून निर्लेखीत झाली असून अद्यापही सदर इमारती मध्ये पंचायत समिती कार्यालयात संपूर्ण विभागाचा कार्यभार सुरू आहे. मागील वर्षी शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाचा पावसाने छत कोसळले होते. सुदैवाने यामध्ये कसल्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. आजही शिक्षण विभाग पाण्याची गळती सुरू असलेल्या कार्यालयात कार्यरत आहे. सदर संपूर्ण इमारत जिर्ण झालेली असून चक्क गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात कामकाज करण्याच्या टेबलावर पाण्याच्या बादल्या संरक्षणासाठी ठेवण्यात आल्या आहेत. चक्क गटविकास अधिकारी हे पाऊस सुरू असताना आपल्या कार्यालयात बसु शकत नाहीत. त्यांना साहाय्य गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयीन टेबलावर बसुन कामकाज करावे लागत आहे. सदर इमारती च्या छताच्या सिमेंट उखडून निघाले आहे.
शिक्षण विभागाच्या कार्यालयात कर्मचारी जीव मुठीत घेऊन नाईलाजाने बसावे लागत असल्याची खंत येथील कर्मचाऱ्यांनी आमचे प्रतिनिधी यांच्या जवळ सांगितले.
सदर समस्या ही जनहिताची असुन येथे ग्रामीण भागातील अनेक नागरिक आपल्या कामानिमित्त येत असतात. पंरतु समस्या मुळे अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याने अनेकांना आलेल्या पाऊली मनस्ताप करून वापस जावे लागते. पावसाच्या दिवसात अनेक ग्रामीण भागातील नागरिक पंचायत समिती कार्यालयात पाण्यापासून बचावासाठी चौपटीत आसरा घेतात. पण पंचायत समिती ब्रम्हपुरी येथील संपूर्ण कार्यालयाचे छत कोसळत असल्याने मोठी दुर्घटना होऊन जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या समस्या कडे प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी तातडीने लक्ष केंद्रित करुन संपूर्ण पंचायत समिती कार्यालय स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.