आरक्षित जंगलात प्रवेश करून चितळाची शिकार करताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या ५ आरोपींना दोषी ठरवून लाखांदूर न्यायालयाने प्रत्येकी पाच हजार रुपये दंडासह १ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल न्या. पूजा कोकाटे यांनी सोमवारी दिला. शिक्षा ठोठावल्यांमध्ये चिचोली अंतरगाव येथील गोविंदा तुळशीराम मोहनकर (७०), विलास पतिराम वाघमारे (30), मंसाराम मोतीराम वाघमारे (४०), दुर्योधन सुदान वाघमारे (५५) व सोमेश्वर परमानंद खरोले (३०) यांचा समावेश आहे. पाच वर्षांपूर्वी लाखांदूर वन विभागाचे काही अधिकारी कर्मचारी रात्रपाळीत अंतरगाव चिचोली येथील कक्ष क्रमांक २७१ या आरक्षित जंगलात गस्तीवर होते. या वनाधिकाऱ्यांना काही इसम जंगलात असल्याचा सुगावा लागला. अधिकारी व कर्मचान्यांनी सापळा रचून बेकायदेशीरपणे रात्रीच्या सुमारास आरक्षित जंगलात प्रवेशकरून वन्य प्राण्यांची शिकार करीत असल्याच्या संशयावरून पाचही आरोपींना रंगेहाथ पकडले. या वेळी पाचही आरोपींना ताब्यात घेत चौकशी केली असता संबंधितांकडून एक गर्भवती मादी चितळ मृतावस्थेत आढळली. घटनेचा पंचनामा करीत पाचही जणांविरुद्ध वन कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करून लाखांदूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यावर १० जुलै रोजी न्या. पूजा कोकाटे यांनी निकाल देताना घटनेतील पाचही आरोपींना प्रत्येकी ५ हजार रुपये दंडासह १ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. घटनेचा तपास तत्कालीन वनपरिक्षेत्राधिकारी रमेश दोनोडे यांनी केला होता. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड. सुनीता भेंडारकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.