कारंजा* : वाशिम-यवतमाळ-अमरावती-अकोला या चार जिल्ह्याच्या मध्यभागी असलेले कारंजा शहर हे अतिप्राचिन-ऐतिहासिक-आध्यात्मिक-धार्मिक व व्यापारी शहर म्हणून ओळखले जात असतांना आणि येथील अखिल विश्वात सुप्रसिद्ध असलेल्या "अ" श्रेणी तिर्थक्षेत्र दत्तावतार श्री नृसिह सरस्वती स्वामी श्री गुरुमंदिर कारंजा या संस्थानमुळे तसेच जैन धर्मियांच्या पौराणिक तिर्थस्थळाच्या मंदिरामुळे संपूर्ण जगभरातील देश विदेशाच्या यात्रेकरूची येथे वर्षातील बाराही महिने वर्दळ असतांना शिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे देशभरातून सर्वोच्च पातळीवरील सरसंघचालक-केन्द्रिय मंत्री -मुख्यमंत्री-राज्यपाल- खासदार-आमदार-शासनाचे सचिव व उच्चाधिकाऱ्याचे नेहमी आवागमन होत असतांनाही "कारंजा" नगरीचा कायापालट होऊ नये.ही दुदैवी बाब आहे. त्याचे कारण म्हणजे "स्थानिक नेते पाहीजे तसे सक्रिय नसल्यामुळे केंद्रिय मंत्री-मुख्यमंत्री यांच्याकडून,शहर विकास आराखडा बनवून,शहराच्या विकासाचा प्रश्न मार्गी लावून हवा तेवढा विकास निधी त्यांना खेचून आणता येत नाही." असेच म्हणावे लागेल. वास्तविक पहाता श्रीक्षेत्र पंढरपूर-शेगावच्या धर्तीवर तिर्थक्षेत्र विकास आराखडा बनविल्यास येथे तिर्थिक्षेत्र आणि पर्यटनाला चालना मिळून स्थानिक नागरिकांच्या बेरोजगारीचा प्रश्न कायम स्वरूपी मिटू शकतो.कारंजा हे शहर व्यापारी शहर म्हणून ओळखले जाते.येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही बाजारपेठ आशिया खंडातील पहिली बाजारपेठ असल्याचाही इतिहास ऐकायला मिळतो.चारही जिल्ह्यातून येथे भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीला येत असतो. त्यामुळे ह्या शेतमालावर प्रक्रिया करणारी औद्यागिक केंद्र आणि शेतमालावर आधारीत ऑईल मिल,दाळ उद्योग व इतर उद्योग इत्यादी सुरु करता येऊ शकतात.दारव्हा (यवतमाळ) किंवा मुर्तिजापूर (अकोला) मार्गावर महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळ स्थापन झाल्यास फार मोठी औद्योगीक वसाहत निर्माण होऊन हजारो स्थानिक मजूरांना रोजगार मिळू शकतो.स्थानिकांच्या उच्चशिक्षणाची येथे कोणतीच सुविधा उपलब्ध नाही.त्यामुळे येथे उच्च शिक्षणाच्या सोईसुविधा होणे जरूरी आहे.येथील पर्यावरण,हवामान,पिण्याच्या पाण्याची सोईसुविधा,कारंजा शहराच्या सिमेवरून गेलेला नागपूर ते मुंबई असा वंदनिय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तसेच नागपूर - औरंगाबाद मार्ग इत्यादी सुविधा कारंजा नगरीच्या विकासाला पूरक असल्यामुळे ह्या कारंजा शहराचा तिर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत विकास करता येईल काय ? याचा अभ्यास स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शासनकर्त्यानी करून निदान "आगामी सार्वत्रिक निवडणूकांना सामोरे जाण्यापूर्वी तरी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गत एखाद्या विकास प्रकल्पाची घोषणा करून त्यावर अंमल बजावणी सुरु करावी." अशी रास्त मागणी कारंजेकर नागरीक करीत असल्याचे वृत्त आमचे प्रतिनिधी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजसेवक संजय कडोळे यांनी कळवीले आहे.