वाशीम : फार पूर्वी मोकाट गुरे ढोरे,जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी,शहरात नगर पालिकेचे आणि ग्रामिण भागात ग्राम पंचायतचे कोंडवाडे असायचे.त्यामुळे मोकाट जनावराच्या त्रासावर सर्वांचेच नियंत्रण असायचे. त्यामुळे एखादी शेळी-बकरी असो किंवा गाय वासरू,म्हैस,घोडा,गाढव असो शेतात किंवा बागबगीच्यात घुसून नासधूस करू शकत नसे. किंवा कुणाच्या घरासमोर,रस्त्यात किंवा रस्त्याच्या चौफुलीवर येत नसे. आज मात्र भर रस्तात, चौफुलीवर,अगदी पोलीस स्टेशन असो किंवा नगर पालिकेचे कार्यालय असो अगदी त्यांच्या नाकावर टिच्चून पाच दहा मोकाट गायी वासरांचा कळप बसून असतो.कधी कधी ही मोकाट जनावरे लहान मुले व शाळकरी विद्यार्थ्या मागे धावतात.तर कधी कधी वयोवृद्धांना धडक मारतात.तर केव्हा केव्हा नेमके भरधाव वाहनांना आडवे येतात. किंवा भर रस्त्यात ठान मांडून बसतात.त्यामुळे वाहनाचे अपघात होऊन प्रसंगी वाहन धारकांचे हातपाय मोडतात. किंवा वेळप्रसंगी जीवितहानी देखील होण्याची शक्यता असते. तसेच महत्वाचे म्हणजे चुकून एखाद्या वाहनाने आडवे येणाऱ्या,एखाद्या कोंबडी बकरीला धडक मारली तर मात्र त्या जनावराचे मालक तात्काळ हजर होऊन हाथोहाथ दुप्पट तिप्पट रकमेची भरपाई वसूल करायला पुढे येतात.हे वास्तव आहे.त्यामुळे आता स्थानिक प्रशासनाने दखल घेऊन मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी नगर पालिका,ग्रामपंचायतचे कोंडवाडे सुरु करून,मोकाट जनावरांवर अंकुश ठेवून,पकडलेली शेळ्यामेंढ्या,गुरेढोरे सरळ सरळ गोरक्षण संस्थेच्या सुपूर्द करण्याची मागणी जनमाणसातून पुढे येत आहे.