वाशिम (जिल्हा प्रतिनिधी) : सोमवारी दुपारी साधारण ३ : ०० वाजता,वाशिम रेल्वे स्टेशनवर एक संतापजनक आणि धक्कादायक घटना घडली. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला समन्वयक आणि अकोल्याच्या सौ.पूजा मालोकार यांच्याशी दोन-तीन नशेधुंद टवाळखोरांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करत छेडछाड केली!
सौ.मालोकार या अकोल्याकडे एका लग्नासाठी निघाल्या होत्या. स्टेशनवर गर्दी असतानाच काही मवाली मुलं अचानक आले आणि त्यांच्या हाताला हात लावत,स्पष्ट छेडछाड करू लागले.त्याच वेळी त्यांच्या पतीने एका आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला,पण इतर आरोपींनी त्यांच्यावर ब्लेड व गोट्यांनी हल्ला केला.हे सगळं भर गर्दीत घडलं.– आणि तरीही पोलिसांचा कुठेही थांगपत्ता नव्हता!
प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा कळस!
या प्रकरणात सर्वात मोठा धक्का म्हणजे – वाशिम रेल्वे स्टेशनवर एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचं उघड झालं.म्हणजे अशा गुन्हेगारांना ना कायद्याची भीती,ना पोलीस प्रशासनाचा धाक! सौ. पूजा मालोकार यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले की, "जर भर दिवसा माझ्या हाताला हात लावला जात असेल, तर सामान्य महिलांचं काय?"
त्यांनी यावेळी थेट पोलिसांवरच संशय व्यक्त करत विचारलं – "या गुन्हेगारांना कुणाचा वरदहस्त आहे का? पोलीस त्यांच्या साथीदार तर नाहीत ना?" अशी बोचरी टीका करत त्यांनी वाशिम पोलिसांची झोप उडवली आहे.
नुसत्या जाहिराती पुरेशा नाहीत!
"महिलांच्या सुरक्षेच्या जाहिराती झळकवल्या जातात, पण प्रत्यक्षात कायद्याचा धाक नाही," असे म्हणत सौ. मालोकार यांनी प्रशासनाला जाब विचारला. "शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनाही जर रक्षण नाही, तर सामान्य महिला कुठं जातील?"
या घटनेने प्रवासी आणि उपस्थित सर्व नागरिक थक्क झाले.अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली,पण पोलीस कुठेच नव्हते ? – ही बाब खूप गंभीर आहे.
आता कारवाई नाही,तर आंदोलन!
सौ.मालोकार यांनी जाहीर केले की, "या घटनेचा निषेध नोंदवत आम्ही लवकरच वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असून,गरज भासल्यास सर्व महिलांना घेऊन तीव्र आंदोलन छेडू."
शेवटचा सवाल – महिलांची सुरक्षितता कुठं आहे?
या घटनेनंतर एकच सवाल प्रत्येकाच्या मनात आहे – देशभरात महिला सुरक्षेची ग्वाही दिली जाते, पण प्रत्यक्षात भर दिवसा सार्वजनिक ठिकाणी जर असे प्रकार घडत असतील,तर हे प्रशासनाचे अपयश नाही का ?
आपल्या प्रतिक्रिया द्या....