सती कमळजा माता जागृत देवस्थान, मोझर ईजारा हे गाव यवतमाळ ते दारव्हा रोडवर कामठवाडा स्टाॕपवरुन १० कि.मी. आहे. सती कमळजा मातेला आजपर्यंत ५०० वर्षे झालीत म्हणजे ५ शतकातील घटना आहे.
कमळजा ही मोझर ई. गावातील हटकर समाजाची खांदवे ची मुलगी होती. मोझर गावात पांढऱ्या मातीची खूप मोठी गढी होती. त्या गढीवर कमळजाचे आई-वडील राहत होते. हटकर समाजाचे ८-१० घरे गावात होती. कमळजाचे लग्न झाले होते. ती एके दिवशी आई-वडील यांचे भेटीकरिता सासरहून माहेरी आली. माहेरी काही दिवस राहून तिला सासरला जायचे होते. कमळजाचे सासरचे लोक खूप श्रीमंत होते. तिचे अंगावर भरपूर सोने होते. तिला परत सासरला जायचे होते म्हणून तिचे भावाने बैलगाडी जुंपली. कमळजा बैलगाडीत बसली आणि भाऊ बैलगाडी हाकलत होता. मोझर गावालाच लागून जंगल होते. काही अंतरावर आल्यावर भावाला असे वाटले की, हिला मारुन तिचे अंगावरील सोने हिसकावून घ्यावेत. कमळता सती असल्याने तिने आपल्या भावाचे मनातील विचार ओळखून घेतले. हा आपल्याला मारुन सोने लुटून घेणार आहे. तिने भावाला गाडी थांबवायला सांगितली. दादा मला लघुशंकेला जायचे आहे. दादाने गाडी थांबविली तसेच कमळजा बैलगाडीतून खाली उतरली. ती थोडी दूर एका झाडाचे मागे गेली. कमळजाला यायला उशिर झाला, ती वापस आलीच नाही. नंतर कमळजाला पाहायला झाडाचे मागे भाऊ गेला, खूप शोधाशोध केला पण कमळजा काही केल्या दिसली नाही. तो बैलगाडी घेऊन घरी आला. आई-वडील तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना घडलेली हकिगत सांगितली.
कमळजाचे वडील काही व्यक्तींना घेऊन कमळजाला शोधायला निघाले. तिचे भावाला विचारले की, कोणत्या झाडामागे गेली होती. तेथील एक एक झाड पाहिले असता एका झाडामागे तिचे साडीचा पदर जमिनीत दिसला. कमळजा येथे गायब झाली असे पक्के ठरले. कमळजाला धरती मातेने जागा दिली व आपल्यात सामावून घेतले असावे. जेथे पदर दिसत होता तेथे खोदकाम केले तर तेथे शरिराचे आकाराचा एक दगड लागला. पूर्ण शरिर लागले नाही.
काही वर्षांनी मोझर ईजारा गावचे गुणाजी पाटील मोहळे यांना असे वाटले की, हा दगड काढून एका ओट्यावर बसवावा. त्यासाठी खोदकाम चालू झाले. जसजसे खोदावे तसतसे हा दगड खाली खाली जात होता. प्रयत्न काही सफल होत नव्हता. मग तेथेच सती कमळजा मातेचे मंदिर गुणाजी पाटील यांनी उभे केले. सती कमळजा मातेने हटकर (खांदवे) परिवाराला शाप दिला असावा किंवा कमळजा कोपली असावी. आज ८-१० घरापैकी एकही घर मोझर गावी अस्तित्वात नाही. जी मातीची गढी होती, तिला खंडार पडायला लागले. या गढीची माती विकून आता गढीच अस्तित्वात राहिली नाही. त्या काळी या गढीवर वाघ येत असे.
सती कमळजा देवस्थान चे बाजूला एक झोपडी बांधून खटेश्वर महाराज, जोडमोहा यांचे शिष्य रामखटेश्वर महाराज १२-१३ वर्षे राहिलेत. तेथे अध्यात्म ज्ञानावर चर्चा करण्यासाठी संत मोझरकर महाराज, सुर्यभान बुवा, धनाजी जावळकर, पांडुरंग बळी नित्य नेमाने असायचे. संत मोझरकर महाराज यांचे गुरु रामखटेश्वर महाराज होते. झोपडी समोर एक धुनी होती. ती नेहमी पेटलेली असायची. त्या धुनीजवळ जंगलातून वाघ येऊन बसायचा. काही वेळाने सुर्यभान महाराज त्या वाघाला म्हणायचे की, उठ रे बुच्या ! तरच तो वाघ उठून जंगलात जायचा.
रामखटेश्वर महाराज भिक्षा मागण्याकरिता शेजारील वडगांव गावात जायचे. सुर्यभान महाराज मोझर गावात भिक्षा मागण्याकरिता जायचे. भिक्षेत फक्त भाकर भाजीच घ्यायचे म्हणजेच अन्न घ्यायचे. मागून आणलेली भिक्षा फक्त एक टाईम खायचे. असा त्यांचा नित्य नेम असायचा. मोझरकर महाराज यांच्या घरची परिस्थिती फारच हलाखीची असल्यामुळे रामखटेश्वर महाराज मोझरकरांचे दोन मुलांना एकनाथ व विश्वनाथ यांना भिक्षेत जेवण करायला बोलावित असे. तसेच येणार जाणार कोणीही असले तरी त्याच भिक्षेत जेवण करीत असत. एके दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या झोपडीवर येणार होते म्हणून फुलांनी झोपडी सजविली व हारे लावले. महाराजांना बसायला आसन टाकले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जवळच असणाऱ्या सावळा गावावरुन भजन करुन मोझर येणार होते. महाराज आले व त्यांचे स्वागत सुद्धा झाले. तेथे थोडा आराम करुन मोझरला भाऊजी बन गोसावी यांचे घरी नास्तापाणी करिता गेले नंतर तेथून जवळच असणाऱ्या हिवरी गावाला भजना करिता गेले. अशी येथील आख्यायिका होती.
सती कमळजा मंदिर समोर एक मोठा सभामंडप बांधण्यात आला. तसेच लग्न प्रसंगाकरिता मोठा हाॕल सुद्धा बांधण्यात आला. बाजूला महादेव मंदिर, रामखटेश्वर महाराज यांचे मंदिर, हनुमानाचे मंदिर येथे बांधण्यात आले आहे. येथील परिसर निसर्गरम्य आहे. शासनाने सती कमळजा माता जागृत देवस्थानाला "क" दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता दिली आहे. नवरात्र काळात येथे भाविकांची फार मोठी गर्दी असते. वरील लेख विशेष माहितीचे आधारे लिहलेला आहे. सर्व हकीगत घडलेलीच येथे जशीच्या तशी वर्णन केली आहे.
आरती सती कमळजा मातेची
जय देवी जय देवता, जय कमळजा माता ।
ओवाळीन पंचप्राण, तुझ्या चरणाशी माथा ।।
जय देवी जय देवता ।।धृ।।
भाग्यवंताचे घरी, तु आली जन्माला ।
वैरी झाला बंधुराया, विनविले धरतीला ।।१।।
सतीचे सत् पाहून, जागा धरतीने दिली ।
देहासहित तेथे तु, एकरुप झाली ।।२।।
बैसुनि एके ठायी, मुर्ती जागृत तुझी ।
सेवा घडो निरांतर, हिच इच्छा आहे माझी ।।३।।
आशिर्वाद एक दिला, या मोझर गावाला ।
टाकिली दिव्य दृष्टी, रोग काॕलरा जाळला ।।४।।
नवरात्र नऊ दिवस, भक्त येती राऊळास ।
दर्शन घेता तुझे, तमोगुण होई नाश ।।५।।
सत्वशाली सती आहे, आई कमळजा माझी ।
दास उभा चरणाशी, आशिष देजो सर्वांशी ।।६।।
(रचना कविः लुंगाजी मारोती धी, मोझर ई.)
लेखकः-
पुरुषोत्तम बैसकार मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक, यवतमाळ
आपल्या प्रतिक्रिया द्या....