जगभरातील श्री गुरुदत्त उपासकाचे पवित्र शक्तीपिठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरुमाऊलीच्या जन्मस्थळी श्री नृसिह सरस्वती स्वामी महाराज संस्थान,श्री गुरु मंदिर कारंजा येथे, मार्गशीर्ष पोर्णिमा दत्त जयंती निमित्त सकाळ पासूनच लाखो दत्तउपासकांनी श्रीचरणी नतमस्तक होत श्रींचे दर्शन घेतल्यामुळे लाखो भाविकांची मांदियाळी बघायला मिळाली. याबाबत अधिक वृत्त असे की, स्थानिक श्री गुरुमंदिराचा डोळ्यांचे पारणे फिटविणारा श्री दत्त जन्मोत्सव बघायला देशाच्या कानाकोपर्यातून भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या वाहनांनी रस्ते फुलून गेले होते. श्रीदत्त जयंती निमित्ताने श्रींचे मंदिर शेवंतीच्या फुलांच्या माळा आणि विद्युत रोषणाईने सजविण्यात आलेले होते. चोहीकडे "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा " या बिजमंत्राचा जाप सुरू होता.श्रींच्या मंदिरामध्ये सकाळ पासूनच नियमीत दैनिकोत्सव सुरु असतांना अत्यंत आनंदोत्साहाने श्रीं गुरुदत्ताचा जन्मोत्सव साजरा करून महाआरती करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला त्यानंतर सायंकाळी श्रींची पालखी काढण्यात आली.असे वृत्त कळविण्यात आले आहे.