श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे सर्वांगीण विकास बाल संस्कार शिबिराचा समारोप
अकोला : मोबाईल आणि नवमाध्यमांच्या या युगात नवी पिढी अध्ययन, जीवनमूल्ये व संस्कार यापासून दुरावता कामा नये. मुलांना ही शिकवण व संस्कार देण्यासाठी सर्वांगीण विकास शिबिरासारखे उपक्रम महत्त्वपूर्ण आहेत, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले.
अकोट येथील श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांगीण विकास बाल संस्कार शिबिराचा समारोप पालकमंत्री श्री. फुंडकर यांच्या उपस्थितीत झाला. श्री क्षेत्र आळंदी (देवाची) येथील वारकरी शिक्षण संस्थेच्या उपशाखेचे उद्घाटनही यावेळी झाले. आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार अमोल मिटकरी, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदिपान महाराज शिंदे, ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष वासुदेवराव महाराज महल्ले, प्रकाश महाराज जवंजाळ, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर आदी यावेळी उपस्थित होते.5
पालकमंत्री श्री. फुंडकर म्हणाले की, पाठांतर, ओव्या, अध्याय, बालमनावर सुसंस्कार करणाऱ्या पारंपरिक अध्ययन पद्धती यांची जपणूक संस्थेतर्फे बाल संस्कार शिबिराच्या माध्यमातून होत आहे. नवमाध्यमांच्या काळात नवी पिढीला आपल्या महान परंपरा व प्राचीन वारसा, मूल्ये यांची शिकवण देण्यासाठी संस्थेकडून प्रयत्न होत आहेत. संस्थेच्या कार्यासाठी व पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य शासन स्तरावरून मिळवून देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.