तालुक्यातील चोरटी येथे संत तुकाराम महाराज कुणबी समाज संघटना, चोरटी यांच्या वतीने कुणबी संघटनेच्या भव्य पटांगणावर संत तुकाराम महाराज जयंती सोहळा आयोजन करण्यात आला होता. या जयंती सोहळ्याचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिवछत्रपती फाउंडेशन ब्रम्हपुरी के अध्यक्ष जगदीश (मोंटू)पिलारे उपस्थित होते. कार्यक्रमाला सहउद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य क्रिष्णाजी सहारे उपस्थित होते. उपाध्यक्ष म्हणून उमेश धोटे सरपंच चौगान, कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून प्रा. सुरज तलमले तर विशेष अतिथी म्हणून राहुल मैंद पत्रकार ब्रम्हपुरी, राहुल भोयर संपादक साप्ता. ब्रम्हपुरी दर्पण, प्रमुख अतिथी म्हणून मानकर सर मुख्याध्यापक जि.प.प्राथ.शाळा चोरटी, गायधने सर जि.प.प्राथ.शाळा चोरटी, राजेंद्र राऊत ग्रा.पं. सदस्य, राजेंद्र ठाकरे ग्रा.पं. सदस्य, सुनीताताई वलके पो.पा. चोरटी, विश्वनाथ ढोरे, नरेंद्र मैंद, संजय भोयर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या जयंती सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, तुकाराम महाराज हे चिकित्सक, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. माणुसकीचा ओलावा त्यांच्या अभंगातून प्रकट होतो. "जया अंगी मोठेपण तया यातना कठीण" ज्यो व्यक्ती, माणूस समाजासाठी वाहून घेतो, लोकांच्या सेवेसाठी आपले जीवन अर्पण करतो. त्या माणसाला समाजद्रोही प्रवृत्ती त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. संत तुकाराम महाराज यांना पण समाजातील वाईट प्रवूत्तीने त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तुकाराम महाराज यांनी वाईट प्रवूत्तीला न जुमानता लोकजागृतीचे कार्य अविरत सुरू ठेवले होते. तेच कार्य आपण सर्व मिळून करणे काळाची गरज आहे. असे ते म्हणाले.
संत तुकाराम महाराज कुणबी समाज संघटना, चोरटी यांच्या वतीने आदर्श पुरस्कार प्राप्त चोरटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षक गायधने यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी गावातील विद्यार्थ्यांना नोटबुक चे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. जयगोपाल चोले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.