लाखांदूर गावालगतच्या शेतशिवारात अवैधरीत्या कोंबडा बाजार भरवून झुंज लावून जुगार खेळत असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ४ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही घटना रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव को येथे घडली. लाखांदूर पोलीसांनी लाला महादेव तलमले (३३), विनायक महादेव तलमले (३०) दोन्ही रा. पुयार, मयूर डुलीचंद जांभुळकर (२४) रा बोडदे / करड ता अर्जुनी मोर व प्रशांत मुकरु खोब्रागडे (२५) रा. पिंपळगाव को यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास पिंपळगाव येथील शेतशिवारात कोंबड बाजार भरवून कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक संदीपकुमार ताराम, पोलीस हवालदार संतोष चव्हाण, उमेश शिवणकर, पोलीस नाईक सतीश सिंगनजुड़े, पोलीस अंमलदार निलेश चव्हाण, राहुल गायधने, अनिल राठोड यासह अन्य पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाड टाकीत ४ आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. काहींनी पळ काढला काय, याचाही शोध सुरू आहे..
या वेळी पोलिसांनी जवळपास १ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, चारही आरोपीविरोधात लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तपास लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीपकुमार ताराम करीत आहेत.