सर्वांची मने, सर्वांची हृदये एक समान झाल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही आणि मनातील विषमतेचे भेदभावाचे विष दूर झाल्याशिवाय एकमेकांची मने जुळून येणार नाही. गरीब, श्रीमंत हा वाद जोपर्यंत मिटणार नाही तोपर्यंत दोन वर्गातील कलह मिटणार नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, "श्रीमंत गरीबांचा वाद, गावास करील बरबाद । म्हणोनी ही दूर करा ब्याद, जाणत्यांनी ।" तसेच "देवाघरी एकची प्राणी, ना श्रीमंत ना भिकारी कोणी " असे असून सुद्धा श्रीमंत गरीबांमध्ये भेदभावाचा संघर्ष सुरु आहे. "कामाकरिता जाती केली, काम विसरुन जातची धरली । जन्मजात थोरवी मिटविली, वर्ण धर्माच्या नावाने ।" काम राहिले कामाच्या जागी आणि जाती, वर्ग, धर्माला कवटाळून बसले.
ऐ दुनियावालो, जागो जरा ।
आपसमें भेद न कर पाओ ।
इस गिरी हुई मानवता को ।
अब तोभी मिल अपनाओ ।।धृ।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या जगातील लोकांना जागृत करीत आहे की, अन्याय, भ्रष्टाचार, असमानता वाढलेली आहे. जगात सकारात्मक परिवर्तन येण्यासाठी तरुणांना प्रेरीत करीत आहे. लोकांमध्ये आध्यात्मिक जागृती यायला हवी. आपसा आपसात असलेला भेदभाव नाहिसा करायला सांगतात. समाजात एकता निर्माण करा. भेदभाव हा जाती, धर्म, रंग, लिंग, आर्थिक स्थिती , गरीबीवर करु नये. दुसऱ्या विषयी सहानुभूती आणि सन्मानाने वागावे. गिरी हुई मानवता म्हणजे मानवता खाली पडणे. मानवी मूल्यांमध्ये आणि वर्तनात नकारात्मक बदल होत आहेत. त्यामुळे माणूस मानवीपणा पासून दूर जात आहे. मानवता म्हणजे प्रेम, करुणा, सहानुभूती , सहयोग करणे होय. आज मानवता एवढी लयाला गेली आहे की, मानवतेला आपलसं कराव लागेल. तेव्हा कुठे समाज चांगला बनू शकेल.
मानवता का गौरव जाती नही ।
धनद्रव्य नही अधिकार नही ।
गौरव है त्याग, चरित्र, विनय ।
और सेवा सबको समझावो ।।१।।
मानवतेचा गौरव जाती नाही. मानवतेचा गौरव म्हणजे करुणा, प्रेम, सहानुभूती आपल्यात असणे होय. धन असणे, अधिकार असणे म्हणजे मानवतेचा गौरव नाही. मानवतेचे मूल्ये आपल्या जीवनात उतरवा. कोणी लहान असो की मोठा असो आपल्याला कोणाचीही भावना दुखविण्याचा अधिकार नाही. गौरव, त्याग, चरित्र, विनम्रता गुण सेवेमध्ये आहे हे सर्वांना समजावून सांगितले पाहिजे. दुसऱ्या करिता त्याग करा. आपले चरित्र मजबूत करा. व्यवहारात विनम्रता असायला हवी. इतरांच्या गरजा पूर्ण आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःचे ज्ञान, कौशल्ये वापरावी.
जो निर्मल-सत्य अहिंसासे ।
होता है पावन साधन से ।
वही ऊँच उठेगा जीवन में ।
उसहीके गुण गौरव गाओ ।।२।।
आपल्या जीवनात सत्य, अहिंसा, निर्मलता असणे पावित्र्य मानले जाते आणि त्याचे पालन करणे आवश्यक आहे. निर्मलता म्हणजे पवित्रता, स्वच्छता जीवनात असावी. सत्य म्हणजे इमानदारीने, सत्याने सर्वांशी वागावे. अहिंसा म्हणजे आपण सर्वांनी हिंसामुक्त जीवन जगले पाहिजे. "अहिंसा परमो धर्म" शुद्ध, खरे (सत्य) ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची हिंसा, द्वेष किंवा कटुता नसावी. ऊँच उठेगा म्हणजे आपले जीवन उन्नत करा. जीवन चांगले आणि अर्थपूर्ण आणि समृद्ध होईल. ज्याचे जीवन आदर्श असेल अशा व्यक्तीचे गुण गौरव गायले पाहिजे.
धनवान हुआ पर पाप करे ।
व्यभिचार करे व्यसनो में मरे ।
अपमानित है उसका जीवन ।
यह निर्भर जाहिर कर जाओ ।।३।।
धनवान असणे हे पाप नाही पण पाप करुन धन मिळवण हे वाईट आहे. धन मिळविण्यासाठी चोरी, फसवणूक, वाईट काम करणे हे पाप आहे. पाप करणे, वाईट मार्ग आत्मसात करु नये. व्यभिचार, अत्याचार आणि व्यसनात का बरे मरता? दारुमुळे जीवनाला धोका निर्माण होतो. व्यसनी, व्यभिचार असलेले जीवन अपमानित आहे. आपले जीवन दुसऱ्यावर अवलंबून आहे ते तू निर्भरपणे सांग. आपले पाप जाहीरपणे उघड कर. अनिती, अधर्माने मिळविलेल्या धनाचा वाईट परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.
तुलसी-तुकड्यासे भेट हुई ।
तब यही चर्चा आखिरमें रही ।
हर मानव प्रेम बढायेंगे हम ही गाये तुमभी गाओ ।।४।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या भेटीकरिता दिल्ली येथे गेले असता तुकारामदादा गिताचार्य यांनी जैन मुनी आचार्य तुलसीजी आणि जैनाचार्य श्री कुमारस्वामी यांची भेट महाराजांशी करुन दिली. या जैन मुनी यांच्या भेटीचं तात्पर्य सांगताना महाराजांनी "ऐ दुनियावालो जागो जरा" या भजनात म्हटले आहे. जैन मुनी आचार्य तुलसीजी व जैनाचार्य कुमारस्वामी यांच्यातील विरोध मिटविला म्हणूनच हे भजन राष्ट्रसंतानी लिहले. या भजनाचा शेवट म्हणजे मानव प्रेम, भावना, करुणा, सहानुभूती वाढविणे होय. प्रेम भावना वाढविण्या करिता जीवन गाणे गात रहावे.
बोधः- संत तुकाराम महाराज म्हणतात "विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ।" हे जग विष्णुमय आहे. वैष्णव हा एकच धर्म सर्वत्र आहे. मानसा मानसा मध्ये भेद करणे ही अमंगळ बाब आहे. आपले गढूळ झालेले चित्त निर्मळ झाले पाहिजे त्याकरिता भेदाभेद करु नये. समाजातील हे भेद संपले पाहिजेत. कोणाचा मत्सर करण्याऐवजी सत्याची कास धरायला हवी कारण आपण सारे एकाच देहाचे अवयव आहोत असे वाटले पाहिजे. समाजात मुरलेला उच्चनिच भाव दूर करण्याचा प्रयत्न संतानी केला त्यामुळे जातीभेद अमंगळ ठरतो.
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....