कारंजा : कोव्हिड 19 कोरोना महामारीच्या सावटानंतर यंदा शासनाकडून शिथिलता असल्यामुळे कारंजा येथील मंगरूळ वेशीवर, सालाबादच्या परंपरेप्रमाणे बैलपोळा उत्साहात संपन्न झाला. मात्र शेतकरी यांत्रीक शेतीकडे वळल्यामुळे यंदा पोळ्यामध्ये वीस ते पंचवीस बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी सर्वधर्मिय नागरिकांनी सर्वधर्म समभाव आणि राष्ट्रिय एकात्मतेचे दर्शन घडवीत अलोट गर्दी केलेली होती. सर्वप्रथम वेशीवरील तोरणा खालून, गावचे मानकरी पाटील, प्रकाश पाटील दिवटे आणि श्याम पाटील राऊत यांच्या मानाच्या बैलजोड्या पूजनानंतर तसेच श्रीफळ फोडल्यानंतर बाहेर पाटील मंडळीच्या बैलजोड्या बाहेर पडल्या . यावेळी बळीराजाने हर हर महादेवच्या गर्जना देत, भरपूर अन्नधान्य पिकून सर्वांना सुखी समाधानी ठेव अशी प्रार्थना केली . त्यानंतर महाराणा प्रताप व्यायाम शाळेचे अध्यक्ष सुरज गुल्हाने यांची बैलजोडी बाहेर पडली व पोळा फुटला. यावेळी शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आधारसिह सोनोने यांनी पिएसआय प्रशांत जाधव यांच्या नेतृत्व चोख बंदोबस्त ठेवला होता तर महाराणा प्रताप व्यायाम शाळा आणि आई कामाक्षा मित्र मंडळाचे स्वयंसेवकांनी मानाच्या बैलाजवळ स्वयंसेवा दिली. एकंदरीत अतिशय शिस्त, शांतता व सलोख्याचे वातावरणात पोळा संपन्न झाल्या नंतर वाजत गाजत बैलजोड्या श्री हनुमान मंदिरा जवळून घरोघरी लोकदर्शनार्थ निघून गेल्या असे वृत्त प्रत्यक्षदर्शी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले .