या जगाने विज्ञानात प्रगती केली आणि विज्ञानाच्या क्षेत्रात !खूप विकास झाला. नविन तंत्रज्ञान, औषधे, अनेक सोयी सुविधा विज्ञानामुळे शक्य झाल्या. विज्ञानाने मानवी जीवन अधिक सुरक्षित, चांगले बनले पण या अधोगतीच्या कलीयुगात धार्मिकता, नैतिकता पार धुळीला मिळाली. हिंसाचार, अत्याचार, बलात्कार, अन्याय वाढले. यामध्ये विज्ञान काहीच बदल घडवून आणू शकत नाही का? मग मनात असा प्रश्न उपस्थित होतो की, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली?
देवाच्या मंदिरात चोरी पाहिली ।
सज्जनाच्या गळ्यावरी सुरी पाहिली ।
साधु संतामध्ये हाणामारी पाहिली ।
पतिव्रता असुनी उपाशी राहिली ।
अशी कशी दुनिया चंद्रावर चालली । चंद्रावर चालली ।।धृ।।
विज्ञानाचे भरपूर प्रगती केली. खूप शोध लावले. यात वाईट काहीच नाही. हे जग चंद्रावर कसे काय चालले असे शाम महाराज म्हणतात. या कलीयुगात कलीचा प्रभाव वाढला आणि वाईट गोष्टी वाढल्या आहेत. देवाच्या मंदिरात चोराला चोरी करताना पाहिले. मानवाच्या घरी चोरी होते पण चोर देवालाही सोडत नाही. सज्जन व्यक्तीच्या गळ्यावर सुरी लावली जाते आणि त्याला लुटले जात आहे. नितिमत्ता पार लयाला गेली आहे. धर्माधर्मासाठी, पंथापंथात साधु संताची हाणामारी पाहिली. हाणामारी म्हणजे मारामारी, भांडणे संघर्ष होत आहेत. हे अत्यंत धक्कादायक आहे. संतामध्ये मतभेदामुळे हाणामारी होऊ शकते. आदर्श पतिव्रता स्वप्नातही दुसरा पुरुष पाहू शकत नाही. ती पतिशी एकनिष्ठ राहणारी, पतिसेवा करणारी असते. पतिला आणि मुला-बाळांना जेवायला घातल्याशिवाय जेवण करीत नाही. अन्न शिल्लक नसेल तर तिला उपाशी राहावे लागते. एवढ्या सर्व समस्यांचे निराकरण केल्या जात नाही आणि दुनिया चंद्रावर अशी कशी चालली?
कुणी अज्ञानी म्हणे कलीचा असे खेळ हा ।
कुणी पंचांगी सांगे कलीने दिला फेरा ।
दोष हा मानवा तुझ्या कर्माचा सारा ।
हुंड्यासाठी मुलगी लग्नाची राहिली ।
हुंडा दिल्यावरी पोर ऊभी जाळली ।
बायकोने नवऱ्याची मर्जी मोडली ।
मग नवऱ्याने बायको बेफाम झोडली ।।१।।
वाईट घडण्याला कुणी अज्ञानी कलीचा खेळ समजतात. अज्ञानी लोकांना पुरेसे ज्ञान नसते. जणूकाही ते कलीयुगामुळे घडत आहे असे त्यांना वाटते. कुणी पंचांग सांगणारे कलीने फेरा दिला म्हणून सांगतात. कुणाच्या कार्यात अडचणी आल्या की कलीने फेरा दिला असे लोक म्हणतात. हे मानवा हा कलीचा फेरा नाही तर तुझ्या कर्माचे फळ तुला मिळत आहे. चांगले व वाईट कर्माचे फळ भोगावेच लागते. हुंडा पद्धती कायद्याने गुन्हा असताना मुले मुलीकडून हुंडा घेतात. गरीबाकडे हुंडा देण्याकरिता पैसे नाही म्हणून आज मुलगी लग्नाची राहत आहे. मुलांना हुंडा दिल्यावर लग्नानंतर सुध्दा मुलीवर अत्याचार करुन जाळले, छळणे जाते. बायको नवऱ्याची मर्जी मोडत आहे. म्हणजेच नवऱ्याच्या इच्छेविरुद्ध, त्याच्या मताला न जुमानता वागणे. संसार म्हटला की संशय होतोच. पति सुद्धा बायकोला बेफाम मार देतो. एवढं सारं काही घडत असताना जग असं कसं चंद्रावर चाललं?
वाढला भ्रष्टाचार आणि काळा बाजार ।
भांडवलदार इथे बनले मुख्य सरदार ।
नकली बियाणे विकती खुले आम बाजारात ।
असे हे देशद्रोही जगती भारत देशात ।
दोन नंबरवाल्याची दिवाळी पाहिली ।
गरीबाच्या घरामध्ये होळी पाहिली ।
फाटकी तुटकी अंगावरी साडी पाहिली ।
लाजे शरमेने खाली पाहे माऊली ।।२।।
आजच्या युगाला भ्रष्टाचार आणि काळाबाजाराने ग्रासले आहे. एखाद्या व्यक्ती आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन भ्रष्टाचार करतो. काळाबाजार म्हणजे एखाद्या वस्तूची टंचाई निर्माण करुन ती वस्तू जास्त किंमतीला विकणे. येथे भांडवलदार मुख्य सरदार बनले आहे. ते उद्योगात, व्यवसायात पैसे, भांडवल गुंतवून नफा मिळवितात. ते नकली बियाणे, खते, किटकनाशके विकून शेतकऱ्याचे नुकसान करताना दिसते. जो देवाशी विश्वासघात करतो, देशाविरोधात काम करतो असे देशद्रोही जगात जगत आहेत. दोन नंबरवाले नैतिक दृष्ट्या योग्य नसलेल्या मार्गाने पैसा मिळवून दिवाळी साजरी करतात. गरीबाचे घरी दिवाळी सणाचे दिवशी खायला अन्न नसते. त्यांना दिवाळी होळी समान वाटते म्हणजे त्यांच्या घरात काहीही नसते. गरीबांच्या स्त्रियांच्या अंगावर फाटलेली साडी पाहायला मिळते. ती फाटक्या साडीत लाजेने मान खाली घालून चालते. एवढं सारं घडतांना दुनिया चंद्रावर अशी कशी चालली?
पडले पुण्य कमी पाप वाढले भारी ।
स्वार्थासाठी रंग ढंग करीती नरनारी ।
गेली इमानी आणि आली सर्व बेईमानी ।
कुणी रंग महालात नित्य करती मनमानी ।
खुर्चीसाठी झगडे मारामारी पाहिली ।
लुचपत खातांना असे लोक पाहिली ।
गावामध्ये आपसात दुही पाहिली ।
गरीबाची गरीबी जागीच राहिली ।।३।।
या जगात चांगले कर्म (पुण्य) कमी होत चालले तसेच वाईट कर्म (पाप) वाढत चालले आहे. व्यक्तीच्या हातून चांगली कृत्ये न होता वाईट कृत्ये जास्त होत आहेत. जो तो आपला स्वार्थ पाहतो. स्वार्थासाठी रंग ढंग करणे म्हणजे देखावा करणे, ढोंग करणे जेणेकरुन स्वार्थ साधता येईल. आजकाल लोकांनी इमानदारी सोडून बेईमानी वृत्तीने वागायला सुरुवात केली आहे. इमानदारी म्हणजे सत्यनिष्ठा, प्रामाणिकता आणि बेईमानी म्हणजे खोटे बोलणे, फसवणूक करणे होय. रंगमहाल म्हणजे सुंदर आणि आरामदायी ठिकाण. तेथे रोज आपल्या मर्जीप्रमाणे वागून मनमानी करतो. पद, प्रतिष्ठा, खुर्चीसाठी, सत्तेसाठी भांडणे, मारामारी करताना पाहायला मिळते. लुचपत, लाच टेबलाखालून पैसे घेतांना पाहिली. लाचखोरी म्हणजे गैरवर्तन करणे. गावांगावात आपसात दुही पाहायला मिळते. गावातीला लोकांमध्ये, गटामध्ये भांडणे, वादविवाद, शत्रूत्वाची भावना पाहिली. गरीबाची गरीबी काही केल्या कमी न होता वाढतच चालली आहे. गरीबाच्या गरजा पूर्ण होऊ शकत नाही. एवढं सारं होताना विज्ञानाची प्रगती कुठे खुंटली आहे. फक्त दुनिया अशी कशी चंद्रावर चालली?
खऱ्या देवाचा विसर पडला सर्व पंथात ।
दगडाच्या देवापुढे देव आणी अंगात ।
खेळती नाचती हे अलग अलग ढंगात ।
चढली अंधश्रद्धा मानवाच्या डोक्यात ।
शाम म्हणे कोंबडीवानी संख्या वाढली ।
कुणी जन्म देऊनी बेवारीस सोडली ।
कुणी आई बापाची मर्जी मोडली ।
बायको संगे प्रेमाने प्रित जोडली ।।४।।
खऱ्या देवाचा विसर सर्व पंथापंथामध्ये पडला. ईश्वर भक्ती कमी झाली. दगडाच्या देवापुढे देव अंगामध्ये आणतात. देव कुणाच्या अंगात येत नाही तो तर सर्वांच्या आतच आहे. देवापुढे वेगवेगळ्या रंगात खेळतात व नाचायला लागतात. ही अंधश्रद्धा मानवाच्या अंगात भिनली. शाम महाराज म्हणतात, मानवाची लोकसंख्या कोंबडी सारखी वाढली. बाळाला जन्म देऊनी कुणी त्याला बेवारस सोडतात. त्या बाळाची कदर कुणीच करीत नाहीत. कुणी आई बापाची मर्जी मोडतात म्हणजे त्यांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण न करणे, त्यांच्या मताला किंवा निर्णयाला विरोध करणे. आईवडिलांचा आदर न करता स्वतःच्या बायको सोबत प्रेमाने प्रित जोडतो. बायको म्हणेल तसे वागतो आणि आई वडिलांचा तिरस्कार करतो. एवढं सारं घडत असताना दुनिया चंद्रावर अशी कशी चालली बरे?
*पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर*
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....