आरमोरी येथील नंदनवन कॉलनीत रहदारीच्या रस्त्यावर निपचित पडलेल्या पक्षाला पशुपक्षीप्रेमी दौलत कुथे यांनी संकट समई जीवदान दिल्याने त्या पक्षाचे प्राण वाचले. आरमोरी येथील नंदनवन कालनीतील सेवानिवृत्त शिक्षक दौलत कुथे हे स्वगृही जात असताना ये-जा असणार्या रस्त्याच्या मधोमध निर्जीव अवस्थेत एक वेगळेच पक्षी दिसले.
तिथूनच दुचाकी व पादचार्यांची वर्दळ होती. तेव्हा त्यांनी त्याला सुरक्षित उचलून घरी आणले व त्याला पाणी पाजून कपड्याने स्वच्छ केले. हळूहळू त्याच्यात सुधारणा दिसू लागली.
पक्षाची ओळख नसल्याने त्याच्या अन्नाबाबत संभ्रम निर्माण झाला. शेवटी तांदळाचे पीठ व पाणी यांचा वापर करून त्याची तीन-चार तास सुश्रुषा करण्यात आली. त्याच्यात सजगता व जागृती दिसताच त्याला लॉनवर खेळविण्यात आले. परंतु मध्येच घरची मनू (मांजर) जवळ येताच त्याला धोका पोहोचू नये म्हणून हातात घेतले.daulat kuthe अल्पावधीतच ते सानिध्यात राहू लागले. यावर निगराणी होतीच. नंतर त्याला घरच्या झाडावर ठेवण्याच्या प्रयत्नात ते मुक्त विहारास सक्षम ठरल्याने निसर्गात भुरकन उडून गेले. शेवटी देव तारी त्याला कोण मारी, अशी ही घटना घडली.
दौलतने पारखली जबाबदारी म्हणून पक्षी उडाले गगनावरी या पक्षाला एकप्रकारे जीवदान देऊन पशुपक्षीप्रेमी दौलत कुथे यांनी माणुसकी जागवली. त्यांच्या या कार्याला आरमोरी नगरीत कौतुकाची थाप पडत आहे. सदर ग्रेहारॉन हा पक्षी दुर्मिळ असून तो एक बगळ्याचा प्रकार आहे. त्याचे मराठीत नाव 'राखाडी बगळा' असे आहे. हा पक्षी युरोप व आफ्रिकेत आढळतो. कुथे यांनी जबाबदारी ओळखत दिलेल्या जीवदानामुळे या पक्षाने गगनभरारी घेतली आहे.