वाशिम :
जिल्ह्यात प्रवेश झालेल्या संत श्री गजानन महाराज पालखी वारीचे स्वागत करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पांडुरंग ठोंबरे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे यांनी श्रींच्या पालखीला नतमस्तक होऊन "वाशिम जिल्हा आरोग्यदायी व सुजलाम सुफलाम व्हावा." यासाठी साकडे घातले.
यासोबतच श्रींच्या चरणी आरोग्य संदेश असणारी टोपी, पंचा व छत्री अर्पण केली.
त्यांच्यासोबत यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी खासबागे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम सपकाळ तसेच मालेगाव तालुक्यातील इतर आरोग्य अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पालखी सोहळ्यासाठी नियोजित आरोग्य पथक व व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आरोग्य विभागाने पुरवठा केलेले आरोग्य संदेश असलेली टोपी, पंचा, टी-शर्ट, सनकोट, ऍप्रॉन परिधान केलेले होते. पालखीच्या पुढे पुढे आरोग्य रथामध्ये आरुढ होऊन जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी स्वप्नील चव्हाण आरोग्य विभागाचीच्या विविध योजनांची प्रचार व प्रसिद्धी करत होते.
मेडशीमध्ये वारकऱ्यांचे जेवण झाल्यानंतर दुपारी पालखी डव्हाकडे प्रस्थान झाली.
सायंकाळी पालखीने डव्हा येथे मुक्काम केला. त्यावेळी मुक्कामाचे ठिकाणी खाजगी वैद्यकीय सेवेकरी यांच्या सहाय्याने शासकीय आरोग्य पथकाने ओपीडीमध्ये २०६ वारकरी व ६४८ भाविक अशा एकूण ८५४ रुग्णांची तपासणी करून त्यांचेवर आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात आला.
२० जून रोजी पालखीने पहाटे डव्हाहून मालेगावकडे प्रस्थान केले. आरोग्य विभागाच्या दिंडीने श्रींच्या पालखीचे स्वागत करून पंचायत समिती मालेगावच्या आवारात पालखीने विसावा घेतला आणि तेथे न्याहरी करून पालखी मुख्य शहरातून माहेश्वरी भावनात थांबली. मालेगावात पंचायत समिती व माहेश्वरी भवन येथे नेमणेत आलेल्या आरोग्य पथकाने तब्बल ४७६ भाविकांना आरोग्य सेवा दिली.
त्यानंतर पालखीने दुपारी शिरपूरकडे मुक्कामासाठी प्रस्थान केले.
पालखी सोहळ्यामध्ये संत श्री गजानन महाराज सेवा प्रतिष्ठान शेगाव यांनी केलेल्या पालखी नियोजनाचे व वाशिम जिल्ह्यातील आरोग्य विभागाने दिलेल्या आरोग्य सेवेचे भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे. तर "रुग्णसेवा, हीच ईश्वरसेवा" हे ब्रीदवाक्य अंगीकारून श्रींच्या सोबत प्रत्यक्ष पांडुरंगाचीच सेवा करत असल्याचे भाव आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहेत. सोबतच "आरोग्यं परमं धनम" ची प्रचितीही वेळोवेळी अनुभवास येत आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....