कारंजा (लाड) : स्थानिक जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ कारंजा आणि विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा कडून सालबाद प्रमाणे यंदाही दिव्यांग वारकरी दिंडी दि.15 जून 2024 ते दि. 18 जून 2024 पर्यंत संपन्न होऊन श्रीक्षेत्र कारंजा (लाड) येथील जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कारंजा अकोला येथील वारकरी मंडळींना रेल्वेचा प्रवास करून श्रीक्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रखुमाई दर्शन) आणि श्रीक्षेत्र तुळजापूर (महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई अंबाबाईच्या दर्शन) येथील वारी घडवली. सदरहु वारीमध्ये महाराष्ट्रातील शेतकरी राजाच्या सुख समाधानाकरीता आणि तिर्थक्षेत्र कारंजा नगरीच्या विकासाकरीता पांडूरंगाला साकडं घालण्यात आले आहे.याशिवाय दिंडीतील वारकरी ज्येष्ठ समाजसेवक प्रदिप वानखडे, संजय कडोळे यांनी वृक्षारोपन, लेक वाचवा-लेक शिकवा, इत्यादी कार्यक्रमा सोबत व्यसनमुक्ती करीता वारकऱ्यांमध्ये जागर केला.
त्यांचे सोबत मोर्शी (जि.अमरावती) येथील सच्चिदानंद सेवा विठ्ठलाची मंडळाच्या सौ रेखाताई डगवाल तथा सौ रेखाताई मडके यांच्या नेतृत्वात सोळा महिला सेवाधारी आषाढी सेवेकरीता श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दाखल झाल्या. यावेळी सर्वप्रथम दिंडीतील सहभागी वारकरी संजय कडोळे,प्रदिप वानखडे,उमेश अनासाने,हभप माणिक महाराज हांडे,हभप अजाब महाराज ढळे, गोपाल मुदगल, सुधाकर इंगोले, सौ संगीताबाई इंगोले,कांताबाई लोखंडे, इंदिराबाई मात्रे आदींनी इस्कॉन मंदिराजवळ बिजारोपण करून वृक्षारोपणाला महत्व दिले. विशेष म्हणजे जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ आणि विदर्भ लोककलावंत संघटनेच्या समाजसेवी कार्याची दखल घेऊन त्यांना पाठबळ देण्याकरीता दि. 16 जून 2024 रोजी श्री संत गजानन महाराज मंदिर भक्तिधाम पंढरपूर येथे जाऊन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळ मुंबईचे सदस्य उज्वल देशमुख (वाशिम) आणि नंदकिशोर कव्हळकर ( कारंजा ) यांनी त्यांची भेट घेऊन कौतुक केले आहे.