शहरात अवैध सट्टा,मटका व जुगार व्यवसाय मोठ्या जोमात सुरु असून स्थानिक पोलिस प्रशासन बघ्याच्या भूमिकेत असल्याने वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी लाभलेल्या शहरात सट्टा, मटका, जुगार व्यवसाय करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होतं नसल्याने व यामुळे मिळणाऱ्या प्रोत्साहनाने अमाप पैश्याची उलाढाल असलेल्या या अवैध व्यवसायाला आलेले भरभराटीचे दिवस बघता दूरवर पसरलेल्या संपूर्ण तालुक्याची अवस्था काय..? असा कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न तालुक्यात निर्माण झाला आहे.
शहर पोलीस मुख्यालया पासून दक्षिणेस दोन किलोमीटर अंतरावर ग्रामपंचायत उदापूर येथे तर पश्चिमेस शासकीय आय.टी.आय. कॉलेज परिसरात शहरातील सट्टा, मटका केंद्र मोठ्या थाटात प्रस्थापित झाले असल्याचे गल्ली-मोहल्यातील लेकरा बाळांना माहिती असून याची माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना नसावी, यापेक्षा शहरासाठी मोठी शोकांतिका काय..? काही वर्षापूर्वी ठाणेदार खोब्रागडे यांनी कर्तव्यदक्षपणा दाखवत व ठोस पावले उचलत अवैध सट्टा, मटका चालवणाऱ्या मालकांच्या मुसक्या आवळल्याने शहर सट्टा, मटका मुक्त बघायला मिळाला मात्र सध्या प्रशासनाला स्थानिक ब्रम्हपुरी शहरातील सट्टा,मटका बंद करण्यात अपयश येत असल्याने तालुक्याची अवस्था काय...? असा प्रश्न उपस्थित होतं नागरिकांत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जातं आहे.
वरिष्ठ अधीकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रानजीक बेकायदा सट्टा, मटका, जुगार व्यावसायिकांचे धंदे फोफावत असल्याने अवैध व्यवसायामुळे कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न तालुक्यात निर्माण होत आहे. विशेषतः सट्टा, मटका माफिया शहरात दोन तीन असले तरी त्यांचे एजंट तालुकाभर पसरले असून किमान दोनशेच्या पलीकडे सक्रिय एजंट च्या माध्यमातून लाखो-करोडोची उलाढाल होतं हा अवैध व्यवसाय स्थानिक प्रशासनाला "मालामाल" करीत भरभराटीस आल्याची नागरिकांत सर्वत्र खमंग चर्चा असून जिल्हा प्रशासनाकडून यावर अंकुश लावण्यात येऊन मोहात गुंतलेल्या सामान्य नागरिकांना सट्टा, मटका, जुगार यातून दिलासा मिळावा अशी सुज्ञ नागरिक आशा बाळगून आहेत.