विदर्भातील तापमानाची चर्चा आता संपूर्ण विश्वात होऊ लागली आहे. बुधवारी जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीतील पहिली तीन शहरे विदर्भातील होती. ब्रम्हपुरी येथे जगातील सर्वाधिक 45.3 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. त्या खालोखाल चंद्रपुरात जगातील दुसऱ्या 45.2 अंश इतक्या तर अकोला येथे जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या 44.9 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. याखेरीज जगातील पहिल्या 15 उष्ण शहरांमध्ये भारतातील 13 तर विदर्भातील पाच शहरांचा समावेश होता.
वर्धा आणि अमरावती येथे 44.2 इतक्या अंश तापमान होते. ही दोन्ही शहरे जगातील दहाव्या क्रमांकाची उष्ण शहरे ठरली. विदर्भातील सर्वच शहरांमधील तापमान 42 अंशांहून अधिक होते. उकाड्यामुळे घरोघरी कुलर व एसीचा वापर वाढला आहे. यामुळे वीज पुरवठा यंत्रणेवरील ताणही वाढू लागला आहे.