वाशिम : कोणत्याही सार्वत्रिक निवडणूका म्हटल्या म्हणजे नेहमीच उमेद्वाराच्या अमर्याद खर्चाची आणि त्याने "पाण्यासारखा खर्च करून" करोडो रुपये काळा पैसा वाटल्याच्या त्याच्या दानशूरतेच्या खमंग चर्चा रंगत असतात.मात्र मागील पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीच्या वारेमाप खर्चाच्या चर्चेचा खुलासा काढून, मतदाराकडून यातील सत्य जाणण्याच्या दृष्टिने आमच्या महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेच्या चमूने प्रयत्न केला असता आम्हाला कळले की, निवडणूक जिंकण्याकरीता उमेद्वाराकडून पैसा जरूर येतो. परंतु तो गरजू,सर्वसामान्य, तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहचतच नाही.निवडणूकीतील उमेद्वार प्रत्येक गावखेड्यात आणि आपल्या प्रत्येक मतदारा पर्यंत पोहचू शकत नसतो. त्यामुळे ही जबाबदारी तो आपल्या सभोवताच्या दोन चार कार्यकर्त्यावर सोपवत असतो. पैसा कितीही खर्च होवो पण निवडून यायचेच यासाठी निवडून येण्याकरीता उमेद्वाराकडून काळा पैसा,शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थाचे सदस्य,जिल्हा परिषद,नगर परिषद,ग्रामपंचायत सदस्य तसेच पक्ष पदाधिकाऱ्याकडे येत असतो.व हे पदाधिकारी आपल्या उमेद्वाराची चापलूसी करीत असतात.त्यामुळे उमेद्वाराचा विश्वास संपादून ते मतदाराकडून आपल्या पारड्यात मते पाडण्याची जबाबदारी घेतात.पुढे निवडणूकीत मिळालेला हा सर्व पैसा ते मधल्या मध्ये स्वतःच गिळून हे कार्यकर्ते फस्त करतात.तर तळागाळातील गाव खेड्यातील सामान्य मतदार त्रस्तच राहतात.हे वास्तव असून,कार्यकर्त्यांना मतदानाकरीता पैशाचा खूपच आग्रह करणाऱ्या चार दोन मतदारांना मात्र दारू व जेवणावर समजावून त्यांची बोळवण केली जाते.बाकी निर्व्यसनी सज्जन गोरगरीब मतदार मात्र निवडणूकीच्या अखेरच्या वेळेपर्यंत, "मतदानासाठी पैसे मिळतील." ह्या नसत्या आशेवर रहातो.व अखेरच्या क्षणी, नाईलाजाने त्याच्या मनाला वाट्टेल त्या उमेदवाराला मतदान करून मोकळा होतो. व या सत्य परिस्थितीचा परिणाम म्हणून निवडणूकीत वारेमाप पैसा उधळणारा उमेद्वार पराभूत होतो.याला कारणीभूत हा त्याचा विश्वासू कार्यकर्ताच असतो.त्याचे कारण म्हणजे हा कार्यकर्ता उमेद्वार आणि मतदार यांना जोडणारा दुवा न ठरता,उमेद्वार आणि मतदार यांच्या मधील दलाल ठरून,फक्त वाहत्या गंगेत स्वतःचे हात धुवून घेत असतो.त्यामुळे यापुढे होणाऱ्या विधानसभा निवडणूकीतील उमेद्वार याची दखल घेऊन दक्षता घेतील काय ? तसेच निवडणूकीत मतदाराचे नावावर खर्च होणारे करोडो रुपये जातात तरी कोठे ? याची शहानिशा करतील काय ? असा सवाल ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी केला आहे. तसेच निवडणूकीत मतदारांना पैशाचे आमिष दाखविणे.हा कायद्याने गुन्हा असल्याचे देखील स्पष्ट केले आहे.