कारंजा (लाड) : गेल्या अनेक वर्षा पासून कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघामधील जनता जनार्दनांच्या सुखं दुःखात सहभागी होऊन गुरुमाऊली यांच्या सामुहिक पारायण आयोजनामधून आपल्या मानवतावादी,धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक कार्याचा परिचय देत, त्यांचे मतदार संघामध्ये सामाजिक सेवा कार्य सुरु होते. त्यांच्या सेवा कार्याचा आलेख पाहता मतदार संघातील योजना महर्षी स्व. बाबासाहेब धाबेकर मित्र मंडळाच्या जुन्या कार्यकर्त्यांचा त्यांना " भाऊ आम्हाला तुम्हीच आमदार हवेत. त्यामुळे तुम्ही निवडणूक लढवाच असा आग्रह होता." त्यामुळे स्थानिक जनता जनार्दनाच्या आग्रहास्तव निवडणूक मैदानात उतरलेले सहकार नेते सुनिल पाटील धाबेकर यांनी महाविकास आघाडीच्या उमेद्वारी करीता आटोकाट प्रयत्न केलेत. परंतु अखेर शिर्षस्थ नेत्याच्या निर्णयापुढे जनशक्तीचा पाडाव होऊन ऐन वेळेवर त्यांची उमेद्वारी रद्द करण्यात आली. त्यामुळे अक्षरश: कारंजा मानोरा विधान सभा मतदार संघातील सर्वधर्मिय सर्वसामान्य जनतेला आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना आघात बसलेला आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकांमध्ये सुनिल पाटील धाबेकर यांनी महाविकास आघाडीचे यवतमाळ-वाशिम मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार संजयभाऊ देशमुख यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याकरीता अगदी जीवाचे रान केले होते.सदर निवडणूकीसाठी ते कारंजा येथे तळ ठोकून बसले होते.शिवाय रखरखत्या उन्हात एकीकडे सर्वांगाची लाही होत असतांना संजयभाऊ देशमुख यांच्या विजयाकरीता खेडोपाडी-वस्ती वाड्यांवर,वार्डा-वार्डात,घरोघरी वणवण फिरत होते.अखेर सर्व घटक पक्षांच्या एकोप्याने संजयभाऊ देशमुख यांचा विजय खेचून आणला.त्यामध्ये सिहांचा वाटा सुनिल पाटील धाबेकर यांचाही होताच असे म्हटले तर निश्चितच वावगं ठरणार नाही. परंतु याची जाणीव न ठेवताच महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी पक्षाने त्यांचा विचार न करता अनपेक्षित असा निर्णय घेतला. व सुनिल पाटील धाबेकर यांना उमेदवारी पासून डावलण्यात आले.त्यामुळे सुनिल पाटील धाबेकर मित्र मंडळ आणि काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले गेलेले असून त्यांच्या करीता हा फार मोठा आघात आहे.म्हणूनच अखेर सुनिल पाटील धाबेकर यांनी आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर अपक्ष उमेद्वारी दाखल करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त असून सोमवार दि 28 ऑक्टोंबर रोजी ते आपली उमेद्वारी दाखल करणार असल्याचे वृत्त त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाले आहे.