शासनाच्या रस्ते बांधकाम विभागासह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे मागील १५ वर्षांपासून तालुक्यातील मांढळ ते गुंजेपार किन्ही मार्गांची - दुरुस्ती झाली नसल्याने यंदाच्या पहिल्याच पावसात या रस्त्याची दुरवस्था होऊन या पावसाळ्यामध्ये रस्ता बांधकामाअभावी या गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता स्थानिक गावकऱ्यांत व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील मांढळ गुंजेपार किन्ही या जवळपास सहा किलोमीटर लांब मार्गाचा मागील १५ वर्षांपूर्वी खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, त्यापुढील काही वर्षांत या रस्त्याची डागडुजी न करण्यात आल्याने, या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
रस्त्यावर पडलेल्या खड्यात पावसाचे पाणी जमा होत असल्याने, विविध वाहनधारकांसह पायी चालणाऱ्या प्रवासी व विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.