गडचिरोली:-
ज्या पतसंस्थेत समाधानी व विश्वासू ग्राहकांची संख्या जितकी जास्त तितकी त्या संस्थेला दीर्घकालीन प्रगती साधण्याची संधी जास्त असते, दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेला सुरुवातीपासूनच समाधानी व उत्कृष्ट ग्राहक लाभल्यामुळे संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत गेल्याचे प्रतिपादन पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री यांनी पतसंस्थेच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात काढले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पतसंस्थेच्या उपाध्यक्ष सुमतीताई मुनघाटे, मानद सचिव सुलोचनाताई वाघरे,ज्येष्ठ संचालक पंडित पुडके, प्रा मधुकर कोटगले, नारायण पद्मावार उपस्थित होते.
अनिल पाटील पुढे म्हणाले, या पतसंस्थेची स्थापना 28 जून 1993 रोजी संस्थापक अध्यक्ष एड. स्व. चूडाराम मुनघाटे व मानद सचिव स्व. प्रा.खुशाल वाघरे यांनी शिस्तबद्ध व अथक परिश्रमातून केली आणि ही संस्था अल्पकालावधीतच नावारूपास आली.आज या संस्थेच्या ९ शाखा असून सर्व शाखा सीबीएस प्रणालीने जोडल्या आहेत त्यामुळे ग्राहकांना कुठल्याही शाखेतून व्यवहार करता येतो. ग्राहकांसाठी क्यूआर कोड व मोबाईल ॲप ची सुविधा सुरू केल्यामुळे ग्राहकांना व्यवहार करणे सोपे व सोयीचे झाले आहे. 21 जून 2025 च्या आर्थिक स्थितीनुसार आज पतसंस्थेकडे 134.32 कोटीच्या ठेवी आहेत संस्थेने 103.98 कोटीचे कर्ज वितरण केले आहे. संस्थेची गुंतवणूक 72.77 कोटी असून राखीव व इतर निधी 31.20 कोटी आहे, आज पतसंस्थेचे वार्षिक उलाढाल 562.77 कोटीची आहे यावरून संस्थेचा आर्थिक पाया अत्यंत भक्कम असून संस्थेचे आर्थिक भरभराट झालेली दिसून येते. संस्थेच्या आर्थिक वाटचालीमुळे संस्थेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन 9001_ 2015 प्राप्त असून 2022 ते 2024 या सलग तीन वर्षात संस्थेला अत्यंत मानाचा राज्यस्तरीय बँको पतसंस्था ब्ल्यू रिबन पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
यावेळी प्रमुख अतिथी पंडित पुडके, प्रा. मधुकर कोटगले, व नारायण पद्मावार यांनी सुद्धा आपल्या मार्गदर्शनातून संस्थेच्या कार्याचा व प्रगतीचा गौरव केला.
यावेळी उत्कृष्ट ग्राहक म्हणून प्रा. गंगाधर हरडे, भास्कर कोटगले, कमलेश भोयर, प्रभाकर नरुले तर उत्कृष्ट अभिकर्ता म्हणून प्रवीण कुकडे व उषा रमेश राऊत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संस्थेच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री यांचा वाढदिवस सुद्धा असल्यामुळे केक कापून व त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा शेषराव येलेकर, संचालन शाखा व्यवस्थापक भूषण रोहनकर तर आभार दिलीप खेवले यांनी मानले. कार्यक्रमाला पतसंस्थेचे संचालक, हितचिंतक, सभासद ,ग्राहक, व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....