उपमुख्यमंत्री ना. देवेन्द्र फडणवीस यांच्या विज कर्मचारी अधिकारी संघर्ष समिती सोबतच्या यशस्वी शिष्टाई मुळे अखेर महाराष्ट्रावरील अंधाराचं गडद संकट टळलं असून कर्मचार्यांनी संप मागे घेऊन, कामावर परतण्याचा निर्णय घेतल्यामुळे अखेर सामान्य ग्राहक नागरिकांना दिलासा मिळाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,सरकारच्या खाजगीकरणाला तिव्र विरोध करण्याकरीता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरणचे तब्बल ८६००० आधिकारी कर्मचारी बुधवारी दि ३ जानेवारी रोजी,एकजुटीने ७२ तासाच्या संपावर गेल्यामुळे, संपूर्ण महाराष्ट्रातील महावितरण कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले होते. विज निर्मिती विभागाचे अधिकारी कर्मचार्यांनी सुद्धा पाठींबा दिल्यामुळे चंद्रपूर- कोराडी, पारस वगैरे अनेक ठिकाणची विज निर्मिती करणारे काही युनिट सुद्धा बंद पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे केव्हा बत्ती १००% बंद होईल हे सांगता येत नव्हते. या संपाच्या आंदोलनात, प्रथमच एकजुटीने एकूण ३२ संघटना एकवटत सहभागी झाल्या होत्या. परंतु अखेर उपमुख्यमंत्री ना. देवेन्द्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य विज कर्मचारी अधिकारी संघर्ष समितीच्या नेत्यांशी यशस्वी शिष्टाई करून दिलजमाई घडवून आणीत, त्यांनी उपसलेले संपाचे हत्यार म्यान करण्यास, विज कर्मचारी यांना भाग पाडले. त्यामुळे तूर्तास विज कंपन्याचे खाजगीकरण करणार नसल्याचे ठोस आश्वासन त्यांनी दिले. महत्वाचे म्हणजे विज निर्मिती व वितरण जर बंद झाले असते तर विद्युत वापराची सवय जडलेल्या निष्पाप नागरिकांना विविध समस्येला तोंड द्यावे लागले असते. शिवाय रात्रपाळी विद्युत पुरवठा बंद होऊन, चोर दरोडेखोर यांना आयती संधी मिळून चोर्या व दरोड्याच्या घटना गावोगावी घडल्याच असत्या एवढे मात्र निश्चित. विज कर्मचारी अधिकार्याचा संप मिटल्यामुळे अखेर सर्व कर्मचारी कामावर परतले असून जनतेला दिलासा मिळालेला आहे.