वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नियामक मंडळाची सभा 13 जुलै रोजी जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांचे अध्यक्षतेखाली वाकाटक सभागृहात संपन्न झाली. सभेला आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, रेशीम विकास अधिकारी एस.पी. फडके,मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त मनोज जयस्वाल, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार, कृषी विज्ञान केंद्र करडाचे केंद्र समन्वय डॉ.काळे, प्रभारी कृषी विकास अधिकारी गणेश गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. षन्मुगराजन म्हणाले, गाव पातळीवर शेतकऱ्यांना विविध प्रकारचे प्रात्यक्षिक दाखविली तर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेती करताना त्याचा उपयोग होईल. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपल्या उत्पादनास सुरुवात करून उत्पादित मालाची विक्री गाव व गावपरिसरात करावी. त्याला मिळणारा प्रतिसाद बघून त्याची व्याप्ती वाढवावी असे ते यावेळी म्हणाले.
श्रीमती महाबळे म्हणाल्या, सन 2023-24 च्या खरीप हंगामात परभणी शक्ती या ज्वारी पिकाची हे पौष्टिक तृणधान्य वर्ष असल्याने या वाणाची निवड केली आहे. प्रति तालुका 25 याप्रमाणे जिल्ह्यात 150 प्रात्यक्षिके घेण्यात येत आहे.ज्वारीचे हे वाण देशातील पहिले जैवसंपृक्त वाण आहे. यामध्ये लोह आणि जस्ताचे प्रमाण आहे. सोयाबीनच्या पीकेव्ही आंबा या वाणाची 25 हेक्टरवर 50 शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. अनुसूचित जातीच्या महिला व पुरुषांच्या 190 गटांना 90 टक्के अनुदानातून हँड पुशर (डिब्लर) देण्यात आले. जिल्ह्यात सेंद्रिय नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. 234 गावात 247 गटातील 9 हजार 999 शेतकरी 10 हजार 37 हेक्टर शेती करीत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
सभेला जिल्हा पशुसंवर्धन विभाग, दुग्धविकास विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, कृषी संशोधन केंद्र, उपविभागीय कृषी अधिकारी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.