कारंजा येथे श्रीदत्त उपासकांचे एकमेवाद्वितीय श्रध्दास्थान म्हणजेच कारंजा नगरीतील सुप्रसिध्द गुरुमंदिर म्हणजेच श्री नृसिह सरस्वती स्वामी महाराज संस्थान हे असून सध्या येथे श्रींचा शैल्यगमण यात्रामहोत्सव मोठ्या आनंदोत्साहात आणि थाटामाटात सुरु असल्यामुळे येथे दत्त उपासकांची मोठी मांदियाळी दिसून येत आहे.याबाबत आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी दिलेल्या वृत्तानुसार,गेल्या दोन वर्षाच्या, कोव्हिड १९ कोरोना महासंकटाच्या,शासन आदेशीत संचारबंदी उठल्यानंतर यंदा पुनश्च एकदा मोकळा श्वास घेत, खुल्या वातावरणात,संपूर्ण भारतवर्षातील श्री दत्त उपासकांचे श्रद्धास्थान असलेल्या एकमुखी दत्तावतार अर्थात श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे जन्मस्थळ असलेल्या प्राचिन व ऐतीहासिक अशा श्रीक्षेत्र कारंजा नगरी येथे सालाबाद प्रमाणे,पौष शुद्ध द्वितीया,रविवार दि.२५ डिसेंबर २०२२ ते माघ वद्य प्रतिपदा, सोमवार दि.६ फेब्रुवारी २०२३ पर्यंतच्या पुण्यकाळी श्रींचा शैल्यगमण यात्रा महोत्सव अतिशय आनंदोत्साहात साजरा करण्यात आलेला आहे.श्रींच्या उत्सवा निमित्त रविवार,दि.२५ डिसेंबर २०२२ रोजी कलश स्थापना,श्री गुरुचरित्र पारायण,श्रींच्या अखंड अहोरात्र विणा वादनाला प्रारंभ करण्यात येवून दुपारी १२:०० वाजता श्रींचा ७२३ वा (सातशे तेविसावा)जन्मोत्सव साजरा आनंदात करण्यात आला.यावेळी हजारो दत्तउपासकांची गर्दी बघायला मिळाली होती. शहरातील रस्ते अक्षरशः भाविक भक्तांच्या मांदियाळीने फुलून गेले होते.त्यानंतर दुसरे दिवसापासून,दररोज सकाळी काकड आरती,भजन, किर्तन,प्रवचन,गायन, हरिपाठ व विविध संगीत कार्यक्रमाची रेलचेल दिसून आली.शिवाय अनेक राष्ट्रिय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील जगप्रसिद्ध व्यक्तींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांचेसह,अनेक सुप्रसिद्धच नव्हे तर जगप्रसिद्ध असलेले गायक,संगीतकार,किर्तनकार, प्रवचनकार यांचे कार्यक्रम साजरे करण्यात आले. शिवाय दररोज श्रींच्या दर्शनार्थ महाराष्ट्र कर्नाटकासह संपूर्ण भारतातील गुरुदत्त उपासकांनी येऊन दर्शनाचा आणि संस्थानाकडून होणाऱ्या अन्नदान महाप्रसादाचा लाभ घेतला.दि.०२ फेब्रुवारी रुद्र स्वाहाकार व शतचंडी स्वाहाकार यज्ञाला प्रारंभ झालेला असून आता सोमवार दि.०६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ठिक १०:०० वाजता यज्ञ पूर्णाहूती होणार असून, दुपारी १२:०० वाजता श्रींची महाआरती होईल व त्यानंतर दुपारी १२:३० ते ०४:०० वाजेपर्यंत नगरभोजन भव्य असा महाप्रसाद होईल.त्यानंतर संध्याकाळी ०६:०० वाजता,श्रींच्या गुरु मंदिरातून,पालखीमध्ये श्रींच्या मुर्तीची शैल्यगमण यात्रा (भव्य मिरवणूक म्हणजेच नगर परिक्रमा) कारंजा नगरीतील मुख्य मार्गाने निघेल.शैल्यगमन यात्रेत टाळ,मृदंग,विणेच्या नादात अनेक महिला पुरुषाच्या भजनी दिंड्या,सहभागी होऊन,संपूर्ण रात्रभर,भजन,अभंग,भावगीते, भारूड,गवळण,सादर करीत,फुगड्या,दांडीया,गरबा, नृत्य सादर करीत आनंदोत्सव साजरा करीत असतात.चौकाचौकात रहिवाशी भक्तमंडळी कडून श्रींच्या पालखी पूजनाची, हारार्पणाची,स्वागताची, दूध, कॉफी,चहापान, फलाहार, अल्पोपहाराची व्यवस्था केल्या जाऊन श्रींच्या पालखीचे, संतमंडळी, वारकरी व परगावच्या भाविक भक्त दत्तउपासकांचे थाटामाटात भव्य असे स्वागत केल्या जात असते.रात्रभर पालखी मिरवणूक संपन्न झाल्यानंतर दुसरे दिवशी मंगळवारी दि.०७ फेब्रुवारी २०२३ रोजी,श्रींची पालखी मिरवणूक श्रींच्या मंदिरात परत पोहचेल.व त्यानंतर श्रींची महाआरती होऊन महाप्रसाद व भजनी मंडळ आणि दिंड्याचा यथोचित मानसन्मान केल्या जाणार असल्याचे वृत्त आहे.सदर्हू पालखी मिरवणूकी करीता दरवर्षी कारंजा नगर पालिकेकडून शहराची साफसफाई व परिक्रमा मार्गावर जलसिंचन तसेच कारंजा शहर पोलिस स्टेशनकडून महिला व पुरुष,पोलिस व गृहरक्षक दलाचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात येऊन भाविकांना सुरक्षा देण्याचे अनमोल सहकार्य दिल्या जात असते.तसेच कारंजा नगरीतील भाविक भक्त मंडळी सुद्धा पालखी मार्गात सजावट,दिव्यांचे चिरांगण,विद्युत रोषनाई, रांगोळ्याची सजावट करीत असतात.त्यामुळे श्रींच्या शैल्यगमण यात्रेच्या दिवशी कारंजा नगरीत अक्षरशः स्वर्ग अवतरल्याचा भास होऊन आनंदोत्सव साजरा होत असतो. असे वृत्त आमचे प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....