कारंजा : आगामी विधानसभा निवडणुकीची उद्घोषणा होऊन आचारसंहिता लागण्याला अवघ्या 72 तासांचाच अवधी ऊरलेला असतांनाच,कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात अफवांचा महापूर उठलेला असल्याचे दिसून येत आहे.यात पक्ष कार्यकर्त्याची अवस्था मात्र कोणता झेंडा घेऊ हाती ?अशी झालेली असून सुज्ञ मतदार राजा देखील संभ्रमात पडल्याचे दिसून येत आहे.सध्या राजकिय पटलावर भाजपा-शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी (अजित पवार) यांची महायुती आणि काँग्रेस-शिवसेना (उबाठा) यांची महाविकास आघाडी असे दोन प्रमुख पक्ष मैदानात राहण्याची शक्यता असली तरी सुद्धा प्रत्येक घटक पक्षातील इच्छुक असलेले डझनावर नेतेमंडळीनी आपआपल्या पक्षांकडे आपली दावेदारी दाखल केलेली असून त्यांचे शिवाय काही व्यावसायिक डॉक्टर मंडळी देखील उमेद्वारी मिळाली तर ठिक आणि नाही मिळाली पुढे बघू.परंतु सध्या मात्र नामांकन करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर अनेक बाहेर जिल्ह्यातील व बाहेरगावच्या नेतेमंडळींनी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाची जहाँगीर हमखास आपल्यालाच मिळणार हे गृहीत धरून मतदार संघात गेल्या 2-3 महिन्यांपासून, स्वतःला पक्षाचे फार मोठे नेते समजणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यापैकी 4-5 कार्यकर्ते हाताशी धरून आणि भाड्याची घरे घेऊन मतदार संघात ठाण मांडून,आरोग्य शिबीर, वृक्षारोपण,गुणवंत विद्यार्थी सत्कार,महिला मेळावे आदी घेऊन आपली प्रचार यंत्रणा राबवली होती. यांचे शिवाय अनेक प्रादेशिक पक्ष,संस्थाध्यक्ष आजी माजी जिल्हा परिषद सदस्य देखील नामांकन करण्यास इच्छुक आहेत. दुसरीकडे मात्र समाज माध्यमावर रोज नविन वावड्या उठत असून अफवांचा महापूर आलेले आहे.आज अमुक नेता पक्ष बदलवून ढमूक पक्षात प्रवेशाच्या मार्गावर तर महायुती मध्ये उमेद्वारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटला मिळाली. महायुतीची उमेद्वारी स्थानिक महिला उमेद्वाराला मिळाली. अशा बिनबुडाच्या वावड्या उठविण्यात येत आहेत.तसेच काहीच गरज नसतांना,सहज म्हणून विधानसभा निवडणूकीचे नामांकन भरण्यासाठी हौसे-गवसे-नवसे देखील मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमावर सक्रिय आहेत.परंतु आमच्या अभ्यास व अंदाजानुसार गेल्या 2014 च्या निवडणूकांपासून भाजपा पक्षाकडे अबाधित असलेला विधानसभेचा हा गड भाजपा कडेच राहणार असून मतदार संघातील महायुतीची उमेद्वारी ॲड. ज्ञायक राजेंद्र पाटणी यांनाच मिळण्याची शक्यता अधिक आहे.तर महाविकास आघाडी मध्ये हा मतदार संघ शिवसेना (उबाठा) गटालाच मिळण्याची दाट शक्यता असून वेळप्रसंगी काही फेरबदल होऊन राष्ट्रवादी (शरद पवार) गटाला जरी उमेद्वारी गेली तरी देखील कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात विजय मिळविण्याच्या दृष्टीने विजयी ठरू पाहणाऱ्या योग्य उमेद्वाराचा शोध घेऊन पक्षश्रेष्ठी महाविकास आघाडी साठी, सहकार नेते विकास योध्दे सुनिल पाटील धाबेकर यांचीच निवड करतील.असो योग्य वेळेवर राजकिय पक्षांकडून योग्य निर्णय जाहीर होईलच. मात्र सध्या तरी समाज माध्यमावर बिनबुडाच्या वावड्यांचा महापूर आल्याने विविध पक्षाच्या कार्यकर्त्याची अवस्था मात्र चलबिचल झाल्याची दिसून येत असल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.