(प्रतिनिधी : संजय कडोळे, वाशिम जिल्हा युवाक्रांती आणि विश्वजगत) स्वरकुंज संगीत महाविद्यालयाचे संस्थापक गायनाचार्य रामकृष्ण सोनुने गुरुजी उकळीकर यांना त्यांच्या सांगितिक योगदानाबद्दल अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ मुंबईच्या वतीने "पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत कला गौरव पुरस्कार 2023" हा मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार त्यांचे सुपुत्र स्वरकुंज चे संचालक प्रा.डॉ.अनिल रामकृष्ण सोनुने यांनी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला.पुरस्कार वितरण समारंभाला विश्वविख्यात कथक नृत्यकार पद्मश्री पुरू दाधीच हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच मंडळाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब सूर्यवंशी, कोषाध्यक्ष डॉ.किशोर देशमुख, व रजिस्ट्रार श्री विश्वास जाधव व अन्य मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. सोनुने गुरुजींचे योगदान संगीत विषयात खूप मोठे आहे. गुरुजीना लहानपणापासूनच संगीत विषयाचा ध्यास होता . वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांना गायन आणि वादनामध्ये आवड निर्माण होती. त्यांनी शालेय शिक्षण वर्ग चौथीपर्यंत घेतले. त्यांनी संगीताचे शिक्षण बुलढाणा येथील श्री रामकृष्ण टाकळकर गुरुजी यांच्याकडे घेतले. त्यानंतर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील वेगवेगळी गावे ,तालुक्याचे ठिकाणी तसेच इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा गुरुजींनी संगीत विषयाचा प्रचार प्रसार केला.त्यांनी १९८९ ला लोणार या ठिकाणी स्वरकुंज संगीत विद्यालयाची स्थापना केली .त्यानंतर त्यांचा मुलगा अनिल च्या इच्छेप्रमाणे वाशिम या ठिकाणी २००५ या वर्षाला स्वरकुंज संगीत विद्यालय सुरू केले.गुरुजींनी आपल्या काळात शेकडो विद्यार्थी घडविले, विशारद केले.गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना निशुल्क सुद्धा शिकविले. त्यांच्या या कार्याची दखल अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाने त्यांना हा मरणोपरांत पुरस्कार प्रदान केल्याबद्दल स्वरकुंज चे संचालक प्रा.डॉ.अनिल सोनुने, संचालिका सौ. किरण सोनुने, मोठे बंधू श्री दिलीप सोनुने, सौ सुनीता सोनुने ,आई श्रीमती प्रयागबाई सोनुने व समस्त सोनुने परिवार व स्वरकुंज संगीत विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आभार मानले आहे.असे भगवान राईतकर यांनी कळवीले.