बल्लारपूर : सर्वोदय विद्यालया जवळील मुरलीधर मंदिराजवळ आराध्या आशिष मानकर वय सहा वर्ष राहणार गांधी वार्ड,ही चिमुकली खेळत असताना एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करत तिच्या गालाचा जोरदार चावा घेत गालाचा लचकाच तोडला. या हल्ल्यामुळे मुलीचा गाल चांगलाच फाटला गेला. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
या घटनेने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. हा कुत्रा पिसाळलेला आहे असे नागरिकांचे वक्तव्य आहे. मुलीचे वडील आशिष मानकर हे मिस्त्री काम करतात. घटनेनंतर लगेच आराध्याला बल्लारपुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले. डॉक्टरांकडून तब्बल एकोणवीस टाक्यांची शस्त्रक्रिया तिच्या गालावर करण्यात आली. परिसरातील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना त्रास होत आहे, त्यांचा बंदोबस्त करावा म्हणून नागरिकांनी पालिकेचा मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.