ट्रॅक्टर विक्रीचे अडकलेले पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एका विधवा महिलेला 50 हजाराची खंडणी मागितल्याप्रकरणी दोन राजकीय पुढार्यांना अटक करण्यात आली आहे. ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विजय ढोंगे असे अटकेतील पुढार्यांची नावे असून, यांच्या अटकेमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
आरोपींनी संगनमताने विधवा महिलेच्या लाचारीचा फायदा उचलून ट्रक्टर विक्रिचे थकीत राहिलेले 3 लाख रूपये काढून देतो म्हणून 50 हजार रुपयांची मागणी केली. सुरूवातीला त्या महिलेने आरोपींना 20 हजार रुपये दिले. उर्वरीत 30 हजार रुपयांच्या मागणीसाठी आरोपींनी त्या महिलेकडे तगादा लावला. त्यामुळे त्रस्त झालेल्या महिलने 10 जून रोजी पोंभूर्णा पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार धर्मेंद्र जोशी करीत आहेत.