यावर्षी सततच्या पावसामुळे आरमोरी शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमध्ये, साचलेल्या पाण्यात जंतुनाशक औषधी फवारण्याची कारवाई नगर परिषद प्रशासनाने तातडीने करावी अशी मागणी वंचित बहुजन महीला आघाडी च्या जिल्हा अध्यक्ष प्रज्ञा निमगडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.
शैक्षणिक , सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर म्हणून गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी शहराची ओळख आहे. परंतु आरमोरी शहरातील नागरिकांना पाहीजे त्याप्रमाणे नागरी सुविधांपासुन वंचित राहावे लागत आहे. संपूर्ण पावसाळा संपण्याच्या मार्गावर असून शहरात डासांच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शहरात औषधी फवारणी करण्यात आली नाही. ही शोकांतिका आहे. प्रत्यक्षात कोणतीही ठोस कृती होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. केवळ कागदावर योजना मांडून उपयोग नाही तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. वाढत्या आजारांपासून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हे प्रशासनाचे मूलभूत कर्तव्य आहे.
सार्वजनिक ठिकाणांपासून ते घनदाट वस्त्यांपर्यंत डासांचा सुळसुळाट झाला आहे. नागरिकांच्या घरांत दिवसा डासांचा त्रास होतोय, तर रात्री झोपणे कठीण झाले आहे. ही परिस्थिती आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असून याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
शहरामध्ये डेंग्यू, टायफाईड तसेच मलेरीया साथरोगाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे यावर नगर परिषद ने तातडीने नियंत्रण उपाययोजना करण्यात याव्यात. डासांचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी, औषध फवारणी प्रभावी पद्धतीने करावी. एकदाच नव्हे, तर सातत्याने ही प्रक्रिया राबवावी. शहरातील प्रत्येक रस्त्याने फागिंग मशीन द्वारे धुरळणी करून निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. निर्जंतुकीकरण औषधी फवारणी करण्यात यावी तसेच संपूर्ण नगर परिषद क्षेत्रात सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमध्ये निर्जंतुकीकरण औषधी टाकावी, फागिंग मशीन द्वारे धुरळनि करून डास व इतर संसर्गजन्य कीटकांचे निर्मूलन करणे गरजेचे आहे.साथीच्या रोगामुळे व वातावरणातील बदलामुळे आरमोरी शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयात उपचारासाठी रूग्णांची संख्या वाढत आहे. दवाखाने रुग्णांनी गच्च भरलेले आहेत. त्यामुळे डेंगू, मलेरिया, टायफाईड इत्यादी साथीचे रोग पसरू नयेत म्हणून तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना स्थानिक नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने करून नागरिकांचे साथ रोगांपासून संरक्षण करावे. अशी मागणी वंचित बहुजन महीला आघाडी च्या जिल्हा अध्यक्ष प्रज्ञा निमगडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.