कारंजा (लाड) : आपल्या विदर्भात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाचे आगमन होताच,आपले लक्ष्य लागते ते माहेरवाशिनींचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौरीपूजनाच्या पवित्र उत्सवाचे ! शक्तीचा अवतार समजल्या जाणाऱ्या आदिशक्ती पार्वतीचे रूप म्हणजे गौराई.त्यांनाच गौराई किंवा महालक्ष्मी म्हणतात.विदर्भात गौरीपूजनाला फार महत्व आहे. गौरीपूजन हा लेकीबाळाचा सण म्हणूनही येथे ओळखल्या जातो. मंगळवार,भाद्रपद शुद्ध षष्ठी दि.10 सप्टेंबर 2024 रोजी अनुराधा नक्षत्राचे शुभ मुहूर्तावर संपूर्ण विदर्भासह आपल्या कारंजा नगरीतही गौराईचे आगमन झाले.गौराई ह्या लहान मोठ्या दोघी बहिणी असतात. त्यांना ज्येष्ठा गौरी-कनिष्ठा गौरी असे म्हणतात. गौराईच्या पूजनाला साक्षात श्री महालक्ष्मी पूजन म्हणूनही ओळखले जाते. गौराईचा उत्सव हा तिन दिवसाचा असतो. पहिल्या दिवशी आगमन दुसऱ्या दिवशी श्रृंगार व सहभोजन आणि तिसऱ्या दिवशी लेकीबाळीची बोळवण असा हा उत्सव सोहळा चालतो.हा उत्सव साधारणतः हिंदु धर्मातील प्रत्येक जाती जमातिच्या किमान एका कुटुंबात तरी केला जातो. शहरापेक्षा खेडेगावात ह्या उत्सवाचे प्रमाण प्रत्येक घरोघरी दिसून येते.कौटूंबीक संबंधामध्ये आपुलकी,जिव्हाळा,ऐक्य आणि परस्परांमधील ऋणानुबंध जोडणारा भावनिक उत्सव म्हणून गौरीपूजनाच्या उत्सवाची ओळख आहे.गौराई सणाला घराला रंगरंगोटी,सडा सारवण, रांगोळ्या घालून अंगण सुशोभित करण्यात येते. घराला रंगीबेरंगी प्रकाश माळा लावतात.पहिल्या दिवशी शालू पैठणी नेसून सोन्या चांदी हिरे मोत्यांचे अलंकार घालून गौरी आवाहनाला गौराई येतात.त्यादिवशी सर्वत्र आनंदी आनंद आणि उत्साहाचे वातावरण दिसून येते.दुसऱ्या दिवशी सकाळ पासून महिलामंडळीमध्ये सगळीकडे गौराईच्या स्वागत समारंभ, महाआरती आणि पाहुचाराच्या जेवणावळीची लगबग दिसून येते. त्याकरीता गौराईच्या भोजनासाठी,गोडाधोडाचे निरनिराळे पक्वान्न,मिष्टान्न,खाऊ, आंबील,कथली, फळं,पुरणपोळ्या केल्या जातात. आरतीच्या वेळी गौराईच्या मुर्त्यामध्ये साक्षात जीवंतपणा आल्याचा साक्षात्कार होतो. यावेळी सुहासिनी साडी चोळी हिरव्या बांगड्यानी देवीची ओटी भरतात.व त्यांनी भोजन घेतल्या नंतर पाहुणे मंडळी,शेजारी,मित्रमंडळी व सर्वात शेवटी घरचे कुटंबातील सदस्य भोजन करतात.तिसऱ्या दिवशी सकाळी देवीला गाठी पाडण्याचा गुढी पाहण्याचा समारंभ असतो.या दिवशी गौराईची पाठवणी करावयाची असल्याने गौराईला पक्वान्न व मिष्टान्न शिदोरी दिली जाते. दोन अडीच दिवस मुक्कामी असलेल्या गौराईला निरोप देतांना घरातील महिला मंडळीसह पुरुषही भावनिक झालेले दिसतात.त्यानंतर गौराईला सुख समृद्धीचे वरदान मागून पुढील वर्षी लवकर या.म्हणून निरोप दिला जातो.कारंजा येथे इतर कुटुंबा प्रमाणेच आमच्या मित्र परिवारातील उमेश हरिभाऊ अनासाने यांच्याकडे पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या परंपरेप्रमाणे गौरीपूजन होत आहे. त्यानिमित्त सर्व भाविक भक्त मंडळींना हार्दिक शुभेच्छा !