वाशिम : जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय राठोड यांनी नुकतीच जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समिती स्थापन केलेली असून सदर समितीवर वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपिर येथील रहिवाशी असलेले प्रतिष्ठित कार्यकर्ते गोपाल शिंदे यांची नियुक्ती केली आहे. गोपाल शिंदे हे यापूर्वी देखील 2014 मध्ये जिल्हा वृद्ध साहित्यीक समिती वर कार्यरत होते. त्यांचे मंगरुळपिर येथे शिंदे टायपिंग ॲन्ड कॉम्प्युटर इन्स्टिट्युट या नावाने प्रतिष्ठान आहे.त्यांच्या नियुक्ती मुळे संपूर्ण वाशिम जिल्ह्यात आनंदोत्साहाचे वातावरण असून कलावंताकडून त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे.यानिमिताने विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा (लाड) यांचे कडून, शनिवार दि. १४ सप्टेंबर २०२४ रोजी, मंगरूळपीर येथे, अंबिका आराधी मंडळाच्या ज्येष्ठ महिला लोककलावंत सौ.सुधाताई डाके यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा मानधन निवड समितीचे माजी सदस्य,विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा (महाराष्ट्र शासन) पुरस्कार तथा संत गाडगे बाबा स्वच्छतादूत राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांचे हस्ते नियुक्ती बद्दल गोपाल शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्ह्यातील ज्येष्ठ लोककलावंत राजाराम पाटील राऊत, मंगरूळपिर ; लक्ष्मणराव इंगळे मंगरूळपिर ; विदर्भ लोककलावंत संघटनेचे लोमेश चौधरी मानोरा ; प्रदिप वानखडे, कैलास हांडे, गोलू पाटील लाहे उपस्थित होते.यावेळी गोपाल शिंदे यांचे अभिनंदन करतांना संजय कडोळे म्हणाले, " जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समितीचा पूर्वानुभव असल्यामुळे गोपाल शिंदे यांच्या नियुक्तीमुळे, तळागाळातील गरजू गोरगरीब सच्च्या व पात्र कलावंताना न्याय मिळून वृद्धापकाळी त्यांना महाकलासन्मान मानधन मिळू शकणार आहे.त्यामुळे गोपाल शिंदे यांचे आम्ही अभिनंदन करीत आहो." तसेच अध्यक्षीय भाषणातून बोलतांना सौ.सुधाताई डाके यांनी देखील, वृद्ध साहित्यिक कलाकार मानधनापासून खास करून महिला मंडळी वंचित असल्याची खंत व्यक्त करीत,गोपाल शिंदे यांच्या नियुक्तीमुळे महिला मंडळीना प्राधान्य मिळून त्यांना देखील वृद्धापकाळी मानधन मिळवून देण्याच्या या महालासन्मान योजनेच्या प्रवाहात आणता येईल असा आशावाद व्यक्त केला. यावेळी लक्ष्मणराव इंगळे तथा राजाराम पाटील राऊत यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून गोपाल शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.शेवटी युवा कार्यकर्ते गोलू पाटील लाहे (गायवळ) यांनी उपस्थितांचे आभार मानले.