कारंजा (लाड) : चालू आठवड्यातील सूर्यदेवाच्या उष्णतेच्या संतापामुळे मानवी शरीराची उकाड्याने लाही होत असतांनाच, बुधवारी दि. 09 एप्रिल 2025 रोजी, दिवसभराच्या उष्णतेनंतर रात्री 08:00 वाजण्याच्या सुमारास अचानक आकाशात काळेकुट्ट ढग दाटून,ढगांच्या प्रचंड गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात, वेगाने वारे वाहू लागले. विजेच्या लपंडावातच काळ्याकुट्ट अंधारात, पावसाचे टपोरे थेंब पडायला सुरुवात झाल्यामुळे, बाजारपेठेतील व्यापारी नागरिकांची त्रेधातिपट उडाली तर पालावर राहणाऱ्या झोपडीवासी नागरीकांची लगबग दिसून आली. अचानक बदललेल्या अवकाळीने अनेक ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतमालाची सारवासारव सुरु झाल्याचेही दिसून आले. यासंदर्भात जिल्हयातील हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांनी मार्च महिन्यात दिलेले दि . 09 एप्रिल ते 17 एप्रिल 2025 पर्यंत,राज्याच्या काही भागासह पश्चिम विदर्भात अवकाळी पाऊस होण्याचे अनुमान खरे होतांना दिसत आहे.तरी अवकाळी पावसाचा अंदाज गृहीत धरून नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे ज्येष्ठ दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी केले आहे.