अकोल्याची पत्रकारिता गेल्या बेचाळीस वर्षांपासून एक फोटोग्राफरच्या 'ऑफ बीट' फोटोंनी समृद्ध करून सोडलीय. वय वर्ष 'साठ' जरी असलं तरी त्याचा कामाचा बाणा कायमच 'ताठ' आहे. फोटोसाठी कधी एखाद्या बिल्डींग, टाकी, वाहन किंवा झाडावर चढायला हा 'तरूण' कायम सर्वात समोर असतो. अकोल्याच्या छायाचित्रकारितेला एक नवा 'आयाम' अन उंची प्राप्त करून देणारा हा उमदा संवेदनशील आणि हो 'चिरतरूण' छायाचित्रकार म्हणजे विनय टोले... म्हणजेच अकोलेकरांचा लाडका 'विनुभाऊ'.... जिंदादिल, जानदार, मनस्वी, शानदार अन तेव्हढाच संवेदनशील अन कलंदरही...
अकोल्याच्या पत्रकारितेत गेल्या चाळीस वर्षांत तीन पिढ्या बदलल्यात. मात्र, या बेचाळीस वर्षांपासून अकोल्याच्या पत्रकारितेच्या क्षितिजावरचा 'विनय टोले' नावाचा 'तारा' फोटोग्राफीच्या रूपानं कायम 'अढळ' आहे. कोणतीही परिस्थिती असो, एका सुंदर 'क्लिक'साठी जीवाचं रान करणारा हा 'फोटोग्राफर'. म्हणूनच त्यांचे फोटो, त्याचे विषय, त्यातील बोलकेपण यातून त्यांनी अव्याहतपणे पेपरचे 'कॉलम्स' सुंदर केलेत. त्यांनी आपल्या फोटोतून अकोलेकरांच्या जगण्याचा 'कॅनव्हास'ही गेल्या चार दशकांपासून 'समृद्ध' केला आहे. मुरलेलं लोणचं जसं चवदार असतं, अगदी तशीच विनूभाऊंची 'फोटोग्राफी' आहे. त्यामूळेच गेली बेचाळीस वर्ष अकोला जिल्ह्याची पहाट त्यांनी काम केलेल्या वृत्तपत्रातील त्यांच्या 'हटके' फोटोने व्हायचीच अन आजही होते आहेय.
विनय टोले स्वभावानं अतिशय रोखठोक अन फटकळ माणूस.. आहे ते तोंडावर बोलणारा... त्यामुळे या माणसाबद्दल अनेकांचे गैरसमजही होतात. परंतू, तुम्ही या माणसाच्या जवळ गेले की तो माणूस तुम्हाला नव्याने समजेल अन उमजेलही... विनूभाऊ म्हणजे अगदी फणसासारखा... वरून 'काटेरी', परंतू आतून आपुलकी अन मायेच्या गोडव्याचा 'गर' असलेला संवेदनशील माणूस. विनूभाऊ जितका 'करारी' तितकाच 'खोडकर' अन 'बेरकी'ही आहे. पत्रकारिता करतांना घडलेले किस्से अन भेटलेल्या माणसांचे अनुभव त्यांच्या तोंडून ऐकतांना आपण तासनतास अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो. आयुष्याची चार दशकं सचोटीने फोटोग्राफी केलेला हा माणुस जेंव्हा आपल्या संस्थेतून निवृत्त झाला तेंव्हा लगेच दुसरी नोकरी शोधण्यासाठी निघाला. कारण, स्वाभिमानी बाण्याचा हा माणूस कधीच एका जाग्यावर बसून राहू शकत नाही. अन कधी निवृत्त होऊही शकत नाही. म्हणूनच आजही 'फिल्ड'वरील पोराच्या, नातवाच्या वयाच्या फोटोग्राफरसोबत काम करतांना हा 'माणुस' सर्वांच्या एक पाऊल अन काकणभर समोरच असतो..
विनूभाऊ!, तुमचा आज वाढदिवस... तुमचं वय किती झालं याचं आम्हाला काहीच 'अप्रुप' अन 'नवल' नाही. कारण, 'वय' हा फक्त तुमच्यासाठी एक साधा 'आकडा' आहे, कारण, तुम्ही या क्षेत्रातील कायम 'चिरतरूण' असेलेले 'सदाबहार' देवानंद आहात... तुम्ही कायम असेच कार्यप्रवण रहा. तुमच्या फोटोतून आपला अकोला, अकोल्याचं सौंदर्य, अकोल्यातीलं माणसं, येथलं सुख, सौंदर्य, दारिद्र्य तुमच्या कॅमेरा 'लेन्स'मधून अधिक ताकदीनं येऊ द्यात. तुमच्या फोटोग्राफीतून आमच्या जगण्याची 'चौकट' अन 'परिघ' असाच समृद्ध होऊ देत. तुमच्या आयुष्याची 'स्टील फ्रेम' कायम अशीच समृद्ध होऊ द्या. वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!....