कारंजा (लाड) : दि 20 नोहेंबर 2024 रोजी झालेल्या मतदानाचे दिवशी यंदा प्रथमच टक्केवारी वाढलेली असल्याचे दिसून आले. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नविन मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. तर दुर्धर आजारग्रस्त,दिव्यांग,वयोवृद्ध मतदार देखील मतदान करण्यास पुढे आले होते.मतदार संघात एकूण तिन आजी-माजी आमदारांचे वारसदार रिंगणात होते. वंचित बहुजन आघाडी कडून माजी राज्यमंत्री स्व. बाबासाहेब धाबेकर यांचे सुपूत्र सहकार नेते सुनिल धाबेकर ; महाविकास आघाडीकडून माजी आमदार स्व. राजेंद्र पाटणी यांचे चिरंजीव युवा नेते अँड ज्ञायक पाटणी ; महायुती मधील घटकपक्ष भाजपाकडून कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या महिला सभापती श्रीमती सईताई डहाके निवडणूक लढवीत आहेत तर स्वकिय आणि स्वतःचे समाजाचा पाठींबा असणारे इतर पक्षाचे काही दिग्गज नेतेही रिंगणात होते. त्यामुळे काहींच्या मते येथील निवडणूक पंचरंगी झाल्याचे सांगण्यात येते.कारंजा येथील एकमेव असलेल्या स्थानिक आणि महिला उमेद्वार म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या विकासपुरुष स्व.प्रकाशदादा डहाके यांच्या अर्ध्यांगीनी श्रीमती सईताई डहाके यांच्या विजया करीता भाजपाने भाजपाचे स्टार प्रचारक असलेल्या उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची कारंजा येथे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पोहरादेवी येथे जाहीरसभा घेऊन तगडी ताकद लावल्याचे दिसून आले होते.तर विरोधी गटातील महाविकास आघाडीनेही राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिर्षस्थ नेत्या संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे यांची विराट गर्दी खेचणारी यशस्वी जाहीर सभा घेतल्याचे दिसून आले.शिवाय वंचित बहुजन आघाडीचे उमेद्वार सुनिल पाटील धाबेकर यांच्या प्रचाराकरीता वंचितचे राष्ट्रीय नेते श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील जाहीर सभा घेऊन भक्कम प्रयत्न केल्याचे आढळून आले. शिवाय या विधानसभा निवडणूकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक उमेद्वाराने प्रत्येक गाव खेड्याला,वस्ती वाड्याला, मोहल्ला वार्डांना भेटी देऊन जास्तित जास्त मतदारांपर्यंत आपले निवडणूक चिन्ह पोहचविण्याचे प्रयत्न केले. कारंजा येथील शेतीपिकाकरीता सिंचनाची सोय नसल्यामुळे केवळ कोरडवाहू पिकांवर अवलंबून येथील शेतकरी राजा सततच्या सुल्तानी आणि अस्मानी संकटामुळे महायुतीच्या शासनावर कमालीचा संतापलेला असल्याचे चित्र मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणूकांच्यावेळी शेतकरी राजाने मतदानामधून स्पष्ट केले होते. परंतु गेल्या तिन चार महिन्यात महायुती शासनाने केलेली कामे, लाडकी बहीन आणि लखपती दिदी योजना, शेतकऱ्यांना पटवून दिलेला संपूर्ण कर्जमाफीचा विश्वास त्यामुळे यंदा विधानसभा निवडणूकीत मतदारांचा अंदाज बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.मात्र यंदाच्या निवडणूकीत स्वतःच्या जाती धर्माचे समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे उमेद्वार रिंगणात असल्यामुळे यंदाची निवडणूक जातीय समिकरणावर झाल्याचे दिसून आले.याचा परिणाम म्हणूनच येथील निवडणूक ही पंचरंगी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात अनपेक्षित असलेला एखादा उमेद्वार निवडून येण्याचा चमत्कार घडण्याची चर्चा मतदारांच्या गावगाड्याच्या गप्पामधून दिसून येत असल्याचे कळविण्यात आले आहे.