चंद्रपूर / दुर्गापूर :- मागील अनेक महिन्यापासून दुर्गापुरात बिबट्याने दहशत माजवली आहे. अनेक लहान मुलांना नरभक्षी बिबट्याने ठार मारले. 10 मे मंगळवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास दुर्गापूर वार्ड क्रमांक 1 मध्ये 3 वर्षीय आरक्षा जगजीवन पोप्पलवार ही मुलगी अंगणात खेळत असताना अचानक बिबट्याने त्या मुलीवर हल्ला चढविला. मात्र बिबट्याचा मुकाबला त्या चिमुकलीच्या आईसोबत झाला, आरक्षा च्या आईने बिबट्याला काठी ने मारत पळवून लावले व आरक्षा चा जीव वाचविला.
बिबट्याच्या हल्ल्यात आरक्षा गंभीर जखमी झाली असून सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे.
अनेकांच्या नरडीचा घोट घेणारा नरभक्षी बिबट्या सध्या आक्रमक झाला असून तो सतत नागरिकांवर हल्ला करीत ठार मारीत आहे. नागरिकांच्या उद्रेकानंतर वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी विविध ठिकाणी पिंजरे लावले होते.
काही दिवसांपूर्वी वनविभागाने एका बिबट्याला जेरबंद केले, त्यानंतर नागरिकांनी बिबट्याच्या दहशतीपासून सुटकेचा निश्वास घेतला मात्र पुन्हा दुर्गापुरात 45 वर्षीय मेश्राम नामक महिलेला बिबट्याने हल्ला चढवीत ठार केले. घटनेला महिना उलटत नाही तर पुन्हा एका चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला, नशीब बलवत्तर म्हणून मुलीची आई बिबट्या समोर उभी राहली व आपल्या मुलीला त्या नरभक्षकाच्या तावडीतून सोडविले. सदर बिबट्याचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहे. दुर्गापुरातील नागरिक वारंवार होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे चांगलेचं संतप्त झाले असून, नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा घेराव केला आहे.