"बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले" असे आमच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीतील संतवचन आहे.परंतू अशी वंदनीय पाऊले आज दुर्मिळ होत चालली, हे मानवी जीवन मुल्यांच्या नैतिक शास्त्राला बसणारे चिंतनीय हादरे आहेत. मानवी समाजाचे जीवन समृध्द करण्यासाठी निरोगी समाजव्यवस्थेला सामाजिक राजकीय क्षेत्रातील कर्मयोगाची संजीवनी सुलभ रितीने प्राप्त होत राहणे क्रमप्राप्त असते.मानवी शरीरातील रक्ताभिसरण यंत्रणेप्रमाणेच तिचेही चलन वलन सुव्यवस्थित राहण्यासाठी आणि या सर्व व्यवस्थेला नियंत्रित ठेवण्यासाठी संविधानासोबतच भारतिय संस्कृतीतून वर्षानुवर्षापासून सिध्द होत गेलेले नीतिशास्राचे अधिष्ठातणही तेवढेच महत्वाचे आहे.त्याचा अंगीकार करून वाणी आणि कृती व्दारे सुनिश्चित पध्दतीने कर्म वाटचाल करण्यासोबतच वाणीचाही धनी जो ठरतो....त्याला वंदनीय..."बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले" म्हटलेले आहे.अशी व्यक्तिमत्वे आज देशातील कोणत्याही क्षेत्रात दिसत नाहीत. दिसली तर ती फक्त अपवादात्मकच.....! ही एक शोकांतिका आहे...!
आजच्या बदललेल्या परिस्थितीत हे आदर्शवादी संकेत चपखलपणे लागू होत नसले तरी "दगडापेक्षा विट मऊ" या न्यायाने राजकीय,सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील जबाबदार सामाजिक व राजकीय नेते आणि प्रशासनातील लोकसेवकांनी समाजस्वास्थ्य संकटात येईल असे करू नये. हिन मनोवृत्तीची परिसिमा गाठून नीतिशास्त्राची अवहेलना होऊ नये, असे समाजालाही वाटत असते.ज्या समाजाने आपल्यावर विश्वास व्यक्त केला.त्या भावनांचा घात होईल अशी पशुतुल्य वाटचाल म्हणजे ती मानवतेच्या मंदिराला क्षतिग्रस्त करणारी अमानविय अधर्मी अपप्रवृत्ती ठरते.
परवा आमचे पंतप्रधान नरेन्द्र मोदीजींनी त्यांच्या गांधीनगरातच मार्गदर्शन करतांना एक महत्वपूर्ण आवाहन केले आहे.ते म्हणतात निवडणूक केंद्रीत विचारांनी शहरांचे भले होणार नाही.म्हणून लोकप्रतिनिधींनी फक्त मर्यादित विचारांनी कार्यरत राहू नये.परंतू "आधी केले मग सांगीतले" असे जर घडत गेले तर निश्चितच अशा आवाहनातील शब्दांचा प्रभाव खालच्या पातळीवरील नेत्यांवर होईल.मग जिल्हा,राज्य आणि देशाला विधायक मार्गाने विकासाच्या दिशेने जाण्यासाठी प्रबळ गती प्राप्त होऊ शकेल.परंतू स्वतः मोदी आणि शहा ही जोडी आणि त्यांचे सरकारातील प्रतिनिधी कसे वागत आहेत हे दृश्य स्वरूपात आहे. त्यांच्या अराजक वटवृक्षांच्या राज्यात राज्यातील फांद्या विरोधी पक्षांचे गळे कापून स्वतःचं चांगभलं कसं करून घेत आहेत,याबाबत अंतरात्म्याला साक्षी ठेऊन जर विचार केला तर त्यांचं अंतर्मन अशी चमत्कारीक आवाहने करण्याचं धाडस त्यांना कदापिही करू देणार नाही. जनतेचे जीवनमान क्लेशदायक करून देशातील लाभाची पंचपक्वान्ने भांडवलदारांच्या घशात घातली जात आहेत. त्यासाठी कारवायांच्या शस्त्रांनी विरोधकांना संपवित निरंकुश साम्राज्याचे अनभिषिक्त राजे होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या सत्ताधाऱ्यांची वाटचाल किती योग्य आणि कशी अयोग्य हे देशातील जनता बिचारी नुसती पाहत आहे.काही काळ सहन करण्यावाचून पर्याय नाही. म्हणून या विनाशी वाटचालीला शुभेच्छा नव्हे, तर गच्छंती करण्यासाठी पाण्यात देव घालून आक्रोशात दिवस घालवित आहेत.
याबाबत आता न्यायालये सुध्दा संधी मिळेल तिथे बोलण्याची तयारी करीत आहेत.परंतू दडपगीरीच्या शिकारी होणारांचे प्रमाण वाढत असून ही गोष्ट लोकशाही संपवून समाज आणि देशाच्या अधोगतीला निमंत्रण देणारी ठरत आहे.त्यामुळेच पूर्वी धमक्या ह्या फक्त गॅंगस्टरांकडूनच यायच्या.परंतू आता ईडी- सीबीआयचा वापर होतो आहे. असा इशारा मुंबई सत्र न्यायालयाने या यंत्रणांच्या गैरवापराविरोधात दाखल झालेल्या प्रकरणात दिला आहे.म्हणजे हे या परिस्थितीवर न्यायालयाकडूनही होत असलेले एकप्रकारचे शिक्कामोर्तबच आहे.याचे मुख्य सुत्रसंचालक कोण आहेत हे सुध्दा देशातील जनतेपासून आता लपून राहिलेलं नाही.
"माणसा माणसा कधी होशील रे माणूस तू?" हा प्रश्न विचारता विचारताच न्यायालयांच्या तारीख पे तारीख प्रमाणेच अनेक दिवस आणि वर्षांमागून वर्ष जात आहेत.परंतू कर्म,विचार आणि भावनांचा दर्जा घसरून, कर्तव्य विसरून वाट चुकलेली माणसे योग्य ध्येय पथावर येण्याचे क्षण दिसत नाहीत.येणाऱ्या बसगाडीची वाट पाहण्याप्रमाणेच सुखाच्या दिवसांच्या प्रतिक्षेतच दररोजचा सुर्य उगवतो आणि कधी मावळतो हे कळत नाही. समाज आणि समाजातील माणसांच्या जीवनमानाचा स्तर उंचावून देशाला प्रगतीची दिशा मिळण्यासाठी लोकांनी लोकशाहीत निवडलेली राजकीय व्यवस्था हा प्रगतीचा मुख्य आधार असतो.परंतू सामाजिक कर्तव्याशी प्रतारणा करून आत्मकेन्द्रीपणा,वैयक्तिक स्वार्थ आणि अघोरी महत्वाकांक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या.त्यामुळे जनहिताची पर्वा न करता स्वत:ची सत्ता आणि आर्थिक वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी समाजाला वेदनामय जीवनाचे उपहार दिले जात आहेत.धर्म,जात,पातीच्या संघर्षात आपसात झुंजी लावून त्या गदारोळात सरकारे पाडणे आणि नीतिमुल्ल्ये,कायद्यांची मोडतोड करून असंविधानिक पध्दतीने,दंडेलीने सत्तेचे नवे नवे गड काबिज केले जात आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने कोंबड्यांच्या झुंजींना खेळ म्हणून अधिकृत मान्यता देण्यासाठीची याचिका फेटाळली.परंतू महाराष्ट्र आणि देशात राज्याराज्यातील राजकीय नेत्यांमध्ये प्राणपणाने लावल्या जाणाऱ्या झुंजी मात्र सामान्न्य जनतेचे बळी जाईपर्यंत
एखाद्या अघोरी खेळाप्रमाणे खेळल्या जात आहेत.आजकाल देशातले काही निर्लज्ज राजकारणी सकाळी काय,दुपारी काय आणि सायंकाळी आणखी काय बोलणार याबाबत कोणतीही विश्वसनियता राहिलेली नाही.त्यामुळे त्यांची वचने आणि आवाहने ही वारंवार येणाऱ्या कोल्ह्याच्या त्या आगमनासारखीच लोकांना वाटतात.लोकांच्या डोळ्यात धुळ फेकण्यासाठी सोयीप्रमाणे कधी धर्माचे उन्माद,कधी संतवचनांचे पोवाडे गाईले जात आहेत.कधी शांतीदुत महात्मा गांधींचे तर महाराष्ट्रात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्या जाते.परंतू त्यांच्या विचार,कृती,आणि समाजधर्माच्या तत्वांशी केल्या जाणाऱ्या प्रतारणेचे जराही वैषम्य वाटत नाही. मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांच्या नावाचा सत्तेसाठी जयघोष ही तर पितामह अडवाणींनी भाजपला मिळवून दिलेली फार मौलिक उपलब्धीची लॉटरी ठरलेली आहे.त्या मर्यादापुरूषोत्तमांचाही सोयीप्रमाणे वापर करण्यात राजनिष्ठा,शिष्टाचार,प्रजाकर्तव्यांच्या सर्व मर्यादा पार झालेल्या आहेत. अशा या घसरलेल्या पातळीवरील क्षुद्र मनोवृत्तीच्या राज्यकर्त्यांचा या देशातील जनतेला आता चांगलाच परिचय झालेला आहे.
खोके आणि समाजविनाशी बेअक्कल डोके कामाला लावत देशातील एक एका राज्यात अतिक्रमण करीत लोकशाही मुल्ये आणि संविधानाला हादरे देत सत्ता बळकावत राहणे,सामान्य जनतेचे जीवन कष्टमय करून भांडवलदारांना गब्बर बनवित त्या आर्थिक कवचकुंडलांनी पक्षिय ताकद वाढवित राहणे, एवढे एकच लक्ष घेऊन देशातील भाजपच्या सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही निर्मितीच्या दिशेने सुरू असलेली विनाशी वाटचाल आहे.ती अनैतिक मनोवृत्तीची तारक आणि नैतिक बळावर चालणाऱ्या मानवी समाजस्वास्थाला प्रचंड प्रमाणात मारक ठरत आहे. याचा विचार आता जनतेने गांभिर्यानेच केला पाहिजे.आपल्या जीवनमानाचा खेळखंडोबा करणारांना वठणीवर आणायचे असेल तर विधायक संघटनशक्तीच्या निर्णायक शक्तीचा आविष्कार आता देशात घडला पाहिजे...!
लेखक व शब्दांकन
संजय एम.देशमुख,जेष्ठ पत्रकार मोबा.क्र.९८८१३०४५४६
आपल्या प्रतिक्रिया द्या....